ज्या नागदेवाने पृथ्वीला आपल्या फण्यावर उचलले आणि त्रिमूर्तीना दिलासा दिला, त्यांची आज पंचमी साजरी केली जाते. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. चला बघूयात बेळगावात कसा साजरा झाला नागपंचमीचा सण !
नागपंचमी हा कर्नाटक-महाराष्ट्रातला एक मोठा सण मानला जातो. नागदेवता पृथ्वीची रक्षक आहे. त्याला शेतकरी आपला मित्र म्हणतात. याशिवाय, भगवान शिवशंकराच्या गळ्यात वासुकी, विष्णूला झोपण्यासाठी आसन म्हणून, ब्रह्मदेवाच्या जवळ असलेल्या नागदेवतेचे महत्त्व आपल्या संस्कृतीत आजकालचे नाही, तर अनादी काळापासून आहे.
बेळगाव परिसरात नागपंचमी पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. खेडोपाड्यात घरच्या तुळईला खास करून घराच्या समोरील भागात झोपले बांधून गाणी गात मुली-युवती नागपंचमीचा आनंद लुटतात. शेत-बांधांवरील वारुळांना, गावातील मंदिरात नागदेवतेला दूध-लाह्यांचा, तंबीटाचा नैवैध्य दाखवून पूजा केली जाते. बेळगावातही ठिकठिकाणच्या नागदेवतेच्या मंदिरात आज विशेष पूजा पार पडली. काल रात्रीपासूनच मंदिरे भाविकांनी फुलून गेली होती. नागपंचनामानिमित्त आज विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक वर्षांपूर्वी बेळगावातील प्रसिद्ध हॉटेल रामदेवजवळ नागदेवतेचे एक छोटे मंदिर सापडले होते. त्याचा जीर्णोद्धार मूळचे उडुपी येथील रामदेव हॉटेलचे मालक रघुराम सेठ यांनी केले होते असे सांगण्यात येते. दरवर्षी येथे नागपंचमीला विशेष पूजा करतात. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून साध्या पद्धतीने पूजा केली होती. मात्र यावेळी नागपंचमी मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. विशेष पूजेनंतर दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सुमारे 2-3 हजार भाविकांनी त्याचा लाभ घेतल्याचे विराज यांनी सांगितले.
बेळगावच्या दक्षिण काशी श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरामध्येही आज नागपंचमी भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कपिलेश्वर मंदिराच्या आवारात भाविकांनी नागदेवतेच्या दगडी मूर्तीची पूजा करून नागपंचमी साजरी केली.
भाविकांनी आज सकाळपासूनच रांगेत उभे राहून नागदेवतेची पूजा केली. नागपंचमीनिमित्त विशेष पूजाही करण्यात आली. नागदेवतेची कृपा प्राप्त करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याशिवाय घरोघरी नागदेवतेची लहान-मोठी मूर्ती आणून घरगुती पूजा करण्यात आली.


Recent Comments