राज्यातील कायदा सुव्यवस्था संपूर्णपणे मोडीत निघाली असून राज्यातील हत्येच्या घटना गृहराज्यमंत्री गांभीर्याने घेत नाहीत, भाजप सरकार कायदा – सुव्यवस्था राखण्यात संपूर्णपणे अपयशी tharle आहे, असा आरोप केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केलाय.

गोकाक येथे शनिवारी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. भाजप सरकार हे आगामी निवडणुकीच्या तयारीत गुंतले आहे. सरकार कसे चालवावे याबाबत भाजप नेत्यांनी चिंतन केले नाही. राज्यात होत असलेल्या हत्यांसंदर्भात हिंदू मुस्लिम असा भेदभाव करण्यात येत आहे. भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली तर २५ लाख रुपये नुकसान भरपाई आणि इतर धर्मीयांसाठी एक रुपयाही भरपाई देण्यात येत नाही. भरपाई वितरणातदेखील भेदभाव करण्यात येत असून याबाबत काँग्रेस आंदोलन नाही तर जनजागृती करेल. भाजप सरकारविरोधात भाजपच आंदोलन आणि विरोध करत आहे. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याऐवजी भाजप सरकार निवडणुकीच्या तयारीत गुंतले असल्याचा आरोप करत सरकारने सर्व धर्मसमभावाने राहावे, असा इशाराही त्यांनी दिला.
दावणगेरे येथे २ ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा एक ऐतिहासिक सोहळा आहे. या समारंभास राहुल गांधी यांचीही उपस्थिती असणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत, अशी माहितीही सतीश जारकीहोळी यांनी दिली.
राज्यात गेल्या काही काळात अनेक हत्या झाल्याची प्रकरणे पुढे आली आहेत. या हत्येप्रकरणी गृहराज्यमंत्री गांभीर्याने पाहत नसून राज्य सरकार कायदा सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली.


Recent Comments