हुक्केरी तालुक्यातील महिला संघांचे उत्पन्न वाढविण्यासाठी उपक्रम राबवून स्वावलंबनासाठी चालना देण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक बचत गटाला १ लाख रुपयांचा निधी देण्यात येत असून या निधीचा सदुपयोग करून महिलांनी आर्थिक स्वावलंबी व्हावे, असे आवाहन मंत्री उमेश कत्ती यांनी महिला संघटनांना केले आहे.
तालुका पंचायत हुक्केरी आणि महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य शासनाकडून बियाणांसाठी निधी देण्यात येत असून या निधीच्या धनादेशाचे वितरण कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले.
बचत गट, स्व साहाय्य संघाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी आणि आर्थिक सक्षम बनविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी प्रत्येक बचत गटाला १ लाख रुपयांचा निधी देण्यात येत असून या निधीच्या माध्यमातून लघु उद्योजक निर्माण व्हावेत, आर्थिक स्वावलंबन व्हावे, यासाठी महिला संघटनांनी मिळणाऱ्या निधीचा सदुपयोग करून नफा दुप्पट करून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन उमेश कत्ती यांनी केले.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजप नेते परगौडा पाटील, बेळगाव जिल्हा पंचायत उपसचिव बी के लाळे, तहसीलदार डॉ. डी एच हुगार, इओ उमेश सिदनाळ, बाळ विकास सहायक संचालक मंजुनाथ परसन्नवर, कृषी विभागाचे सहायक संचालक महादेव पटगुंदी, नगरपालिका सदस्य भीमसेन गोरखनाथ आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments