Belagavi

सौंदत्तीत मूलभूत सुविधांसाठी जोगतिणींचा प्रशासनाकडे जोगवा 

Share

उत्तर कर्नाटकाची शक्तिदेवता, लाखो भाविकांची आराध्य देवता सौंदत्ती श्री रेणुकायल्लम्मा देवीच्या डोंगरावरील तीर्थक्षेत्रात असुविधांच्या निषेधार्थ जोगतिणींनी आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डोक्यावर देवीचा जग घेऊन निदर्शने केली.

होय, सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावरील तीर्थक्षेत्र अनेक गैरसोयींचे आगर बनले आहे. मूलभूत सुविधांअभावी भाविकांची तेथे गैरसोय होत आहे. याच्या निषेधार्थ जोगतिणींनी बेळगावात आज आगळेवेगळे आंदोलन केले. देवीची मूर्ती असलेला जग डोक्यावर आणि हातात पडल्या घेऊन चवऱ्या ढाळत देवीचा उदकार करत जोगतिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. भाविकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलेल्या मंदिर व्यवस्थापन समितीचा त्यांनी तीव्र निषेध करून त्यांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना निदर्शक जोगतिणींनी सरकार आणि मंदिर व्यवस्थापन समितीविषयी संताप व्यक्त केला. देवीच्या डोंगरावर जोगतिणी आणि भक्तांसाठी कसल्याच प्रकारच्या सोयी-सुविधा पुरविलेल्या नाहीत. आम्ही १०-२० हजार रुपये खर्च करून देवीच्या दर्शनासाठी जातो. परंतु तेथे कसल्याही प्रकारच्या सोयी नसल्याने आमची गैरसोय होत आहे. प्रत्येक गोष्टीला दुप्पट पैसे मोजावे लागतात. राहण्याची सोय नाही, भाड्याने खोल्याही मिळत नाहीत. त्यामुळे भाविकांना सोयी पुरविण्यासाठी आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जोगवा मागत आहोत असे निदर्शक जोगतिणींनी सांगितले. यावेळी बोलताना जयभीम ओम साई संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू टोम्बरे म्हणाले, सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर स्वच्छता अजिबात नाही. भाविकांसाठी शौचालय, बाथरूम नाही, पाण्याचीही चांगली सोय नाही. काही खरेदी करायची तर दुप्पट पैसे मोजावे लागतात. त्यामुळे या सगळ्या भ्रष्टाचाराला अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचा संशय येतो. अधिकारी आपल्याला हवे त्यांना देवीचे थेट दर्शन घडवितात. मात्र सामान्य भक्तांना सकाळपासून सायंकाळपर्यंत रांगेत थांबून, पायऱ्या चढत दर्शन घ्यावे लागते अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. बाईट

सौंदत्ती रेणुका-यल्लम्मा देवी कर्नाटकच नव्हे तर महाराष्ट्र, गोवा, आणि आंध्र प्रदेश सारख्या दूरवरच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दररोज हजारो भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्याकडून मंदिर व्यवस्थापन समितीला लाखो-करोडोंचा महसूलही शुल्क आणि दानाच्या माध्यमातून मिळतो. मात्र भक्तांना मूलभूत सुविधा पुरविण्यात येत नाहीत अशी कायमची ओरड आहे. आता जोगतिणींनीच यासाठी थेट बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे सुविधांचा जोगवा मागितला आहे. किमान यानंतर तरी भाविकांना मूलभूत सुविधा मिळणार का? जिल्हा प्रशासन यासाठी पुढाकार घेणार का हे पाहणे कुतूहलाचे ठरेल.

Tags: