“मानवतेसाठी योग” या घोषवाक्यासह बेळगावातील सुवर्णसौधच्या आवारात मंगळवारी सकाळी आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात आणि अर्थपूर्णरीत्या साजरा करण्यात आला.

बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, आयुष खाते, युवा सबलीकरण आणि क्रीडा खाते, शिक्षण विभाग, पर्यटन विभाग, राणी चेन्नम्मा विद्यापीठ, स्काउट्स अँड गाईड्स, सेवादल, नेहरू युवा केंद्र आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
खासदार मंगल अंगडी, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी, राणी चेन्नम्मा विद्यापीठाचे कुलपती प्रा.रामचंद्रे गौडा, जिल्हा आयुष्य अधिकारी श्रीकांत सुनधोळी, शंकरगौडा पाटील आदी मान्यवरांनी रोपाला पाणी पाजून योग दिनाचे उदघाटन केले.
चालन क्रिया, स्कंद संचालन, ताडासन, वृक्षासन, पाद हस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, भुजंगासन, शलभासन, उत्तान पादासन, अर्ध हलासन यासह विविध प्रकारच्या योगासनांचा यावेळी सराव करण्यात आला. राणी चन्नम्मा विद्यापीठातील योग शिक्षक आंतरराष्ट्रीय योग रेफ्री संकल्प योग शाहुनगरच्या आरती संकेश्वरी यांनी योगसाधना करवून घेतली. त्यांनीच योगदिनाची शपथ देऊन प्रार्थना म्हणवून घेतली.
त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रस्तरीय सुवर्णपदक विजेती दक्षा बेविनमरद हिने भरतनाट्यमच्या माध्यमातून अद्भुत योग प्रदर्शन करून सर्वांची वाहवा मिळवली. त्यानंतर अथर्व सवनूर याने नृत्य सादर केले. या वेळी जैन हेरिटेज शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, प्रत्येकाने दररोज योगासने करून आपले आरोग्य सुधारले पाहिजे. आरोग्य उत्तम राखून सदृढ देश घडवण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विविध खात्यांचे अधिकारी, राणी चेन्नम्मा विद्यापीठ, स्काउट्स अँड गाईड्स, सेवादल, नेहरू युवा केंद्र आणि पतंजली योग समितीचे पदाधिकारी, नागरिक असे एक हजारहून अधिक योगप्रेमी उपस्थित होते.


Recent Comments