गटारात पडून एका दुचाकी वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बेळगावातील दत्त गल्ली, माधवपूर वडगाव येथील दत्त मंदिराजवळ आज गुरुवारी सकाळी घडली.

हा युवक हा वडगाव चावडी गल्ली येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मृत युवक अविवाहित असून तो यंत्रमाग व्यावसायिक होता, असे समजते.
दत्त गल्लीतील गटारीनजीक त्याची दुचाकी आडवी पडली असून त्या युवकाचा पाय दुचाकीत अडकला होता. त्याचा डोकीपासून कमरेपर्यंतचा भाग गटारीत तर कमरेपासून खालील भाग गटारीबाहेर होता. पडल्यानंतर त्याचे डोके नव्याने बांधलेल्या गटारीच्या वरील कोनावर आढळल्याने गंभीर दुखापत होऊन त्या युवकाचा मृत्यू झाल्याचे सकृतदर्शनी दिसते. त्याच्या कान आणि मानेच्यामध्ये मोबाईल होता. तर त्याच्या दुचाकीचे स्टँडही लावलेले होते. हे पाहता कोणाचातरी फोन आल्याने गाडी गटारीनजीक उभी करून तो कानाला मोबाईल लावून बोलताना त्याचा तोल गेला असावा आणि नजिकच्या गटारीत पडल्याने डोकीला जबर मार लागून त्याचा मृत्यू झाला असावा, असा कयास आहे.
घटनेनंतर तब्बल दोन तासाहून अधिक वेळ तो युवक गटारीत पडून होता. घटना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्या युवकाच्या आई-वडिलांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे.


Recent Comments