बेळगाव तालुक्यातील होन्याळ गावातील महालक्ष्मी देवी मंदिराची म्हटली जाणारी जमीन आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ग्रामस्थांनी ही जागा मंदिराची असल्याचा दावा केला आहे तर जागा खरेदी केलेले माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई यांनी कायद्यानुसार जागा खरेदी केल्याने ती आपली असल्याचा दावा केला आहे.

होय, होन्याळ गावातील महालक्ष्मी देवी मंदिराची जमीन पुजाऱ्याने बेकायदेशीररित्या विकली आहे असा आरोप करून, ती पूर्ववत मंदिराला द्यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज बेळगावात ग्रामीण एसीपी कार्यालयासमोर निदर्शने केली. सुमारे ७००-८०० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या होन्याळ गावात श्री महालक्ष्मी देवी मंदिराची ४ एकर २८ गुंठे जमीन असून त्याचा देवस्थानची उपयोग केला जातोय. मात्र ११ वर्षांपूर्वी मंदिराच्या पुजाऱ्याने ती विकून खाल्ली. ग्रामस्थांनी याबाबत त्याला बोलावून चौकशी केली असता, मी सगळे काही ठीक करतो असे सांगून तो जो गेला ते आजपर्यंत गावात त्याने पाऊल ठेवलेले नाही.
पुजाऱ्याकडून जमीन खरेदी केल्याने त्या जमिनीची दुसऱ्या खरेदीदाराला विक्री केली. या जमिनीतील देवीची गदग नष्ट करण्यात आली आहे. २-३ महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी नवीन गदगेची स्थापना करून ही जमीन महालक्ष्मी मंदिराची असल्याची तक्रार प्रांताधिकारी कार्यालयात दिली आहे. जमिनीच्या खरेदीदाराकडून त्या ठिकाणी येऊन गोंधळ माजविण्यात येत आहे. या प्रकरणी कोर्ट देईल तो आदेश आम्ही पाळू, पण तोवर तेथे येऊन कोणी गोंधळ घालू नये असे आम्ही सांगितले होते. मात्र ग्रामीण रेसिपींकडे आमच्यावर तक्रार करण्यात आली आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, या जमिनीची सर्व कागदपत्रे मंदिराकडे आहेत. जमिनीची विक्री कायद्यानुसार झालेली नाही. कोणत्याही कारणावरून मंदिराची जागा विकत येत नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मंदिराच्या जागेवर पुजाऱ्याचे नाव लावता येत नाही. केवळ मंदिराचेच नाव लागले पाहिजे. त्यामुळे मंदिराची जमीन मंदिराला परत मिळाली पाहिजे. सांबरा गावचे काँग्रेस नेते नागेश देसाई याबाबत तक्रार करत आहेत. कोर्टात खटला सुरु आहे. तरीही ग्रामस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल केले तर आम्ही गप्प कसे बसायचे असा सवाल त्यांनी केला. 
दरम्यान, आपल्यावरील आरोपांवर प्रतिक्रिया देताना माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई म्हणाले, मी कायद्यानुसारच ही जमीन खरेदी केली आहे. ही जमीन खरेदी करणारा मी तिसरा व्यक्ती आहे. मी जमीन खरेदी करताना कुणीही ही जागा मंदिराची असल्याचा दावा केला नव्हता. आता अचानक माझ्या अंगावर येत जबरदस्ती करत आहेत. त्यामुळे मला संरक्षण द्या म्हणून मी तक्रार दिली आहे. मी ही जमीन खरेदी केल्यानंतर ८ वर्षांनी २ एकर १८ गुंठे जमीन दुसऱ्याला विकली आहे. आता माझ्या नावावर २ एकर १० गुंठे जमीन असून मी तेथे व्यवसाय करत आहे असे समर्थन त्यांनी केले.
एकंदर होन्याळ गावातील महालक्ष्मी मंदिराच्या जागेच्या मुद्याला आता वादाचे स्वरूप आले आहे. ग्रामस्थ ही जमीन मंदिराची असल्याचे म्हणतात, तर नागेश देसाई यांनी आपण कायदेशीररीत्याच ही जमीन खरेदी केल्याचा दावा करतात. या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु आहे. आता पुढे काय होते हे पहावे लागेल.


Recent Comments