बेळगाव बागायत खाते आणि कोल्हापूर पणन विभाग यांच्या संयुक्ताश्रयाने बेळगावमध्ये आंबा महोत्सवाला सुरुवात झाली आहे.
बेळगाव बागायत खात्याच्या परिसरात हा भव्य आंबा महोत्सव आयोजित केला गेला आहे. बागायत विभाग, जिल्हा पंचायत बेळगाव आणि कोल्हापूर पणन विभाग यांच्या संयुक्ताश्रयातून हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून २६ मे ते २९ मे पर्यंत हा महोत्सव चालणार आहे. या आंबा महोत्सवात अनेक प्रजातींचे आंबे उपलब्ध असून विविध प्रजातींच्या आंब्यांची चव आता बेळगावकरांना चाखता येणार आहे.
बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आंबे या महोत्सवात दाखल झाले असून प्रदर्शन आणि विक्री अशा पद्धतीने हा महोत्सव सुरु आहे. तोतापुरी, केसर, मलगोवा, दूधपेढा, कोंकण रुची, हापूस, रसपुरी,दसेरी, बेनेशान, सिंधुरी, मल्लिका, खोबरी, देवगड हापूस, कोंकण हापूस, लिली, नीलम, रत्ना, अशा विविध २५ प्रजातींचे आंबे या महोत्सवात दाखल झाले आहेत.
या महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी आलेल्या आंबाप्रेमींनी येथील विविध स्टॉल्सना भेट देत अनेक आंब्यांची चव चाखली. या महोत्सवात दाखल झालेल्या आंब्यांची खरेदीही मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी केली आहे.
फलोत्पादन विभागानेही या आंबा महोत्सवासंदर्भात आनंद व्यक्त केला आहे. राज्यातील आंबा उत्पादकांच्या हितदृष्टीने आणि शेतकऱ्यांनी पिकविलेला आंबा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भरविण्यात आलेल्या या आंबा महोत्सवाचा लाभ प्रत्येक आंबाप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंबा महोत्सवाचा लाभ बेळगावकरांना २९ मे मे पर्यंत घेता येणार असून या महोत्सवाला सर्वानी अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.


Recent Comments