Belagavi

क्रीडाभारतीतर्फे बेळगाव-कोल्हापूर बाईक रॅली

Share

बेळगावात रविवारी सकाळी क्रीडा भारती संघटनेतर्फे भारत परिक्रमा उपक्रमांतर्गत बेळगाव ते कोल्हापूर अशी भव्य बाइक रॅली काढण्यात आली.

होय, क्रीडा भारती या देशव्यापी संघटनेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरातील २२५ ठिकाणांहून रविवारी भारत परिक्रमा उपक्रम राबविण्यात आला. बेळगाव शहरातही आज सकाळी क्रीडा भारती संघटनेतर्फे भारत परिक्रमा उपक्रमांतर्गत बेळगाव ते कोल्हापूर अशी भव्य बाइक रॅली काढण्यात आली. शहरातील शिवाजी उद्यानात राष्ट्रभक्तांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रध्वजाला अभिवादन करण्यात आले. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, विधान परिषद सदस्य अरुण शहापूर, बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर, भाजप नेते डॉ. रवी पाटील, विरेश किवडसन्नावर, विकास पवार आदी मान्यवरांनी बाईक रॅलीला चालना दिली.

यावेळी बोलताना आयोजकांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशप्रेमाची भावना जागृत करून राष्ट्राला नमन करण्यासाठी या रॅलीचे आयोजन केले आहे. अनेक क्रीडापटू आणि क्रीडाप्रेमी या रॅलीत सहभागी झाले आहेत. देशभरात आज एकाचवेळी, एकाचदिवशी २२५ ठिकाणांहून हा ‘भारत परिक्रमा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात १८ हजार लोक सहभागी झाले आहेत. साडेतीन तासांत संपूर्ण देशाची परिक्रमा करून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी उद्यानापासून सुरु झालेली ही रॅली महात्मा फुले रोड, बसवेश्वर उद्यान, धर्मवीर संभाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे नेण्यात आली. बसवेश्वर, डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून नंतर ही रॅली कोल्हापूरकडे मार्गस्थ झाली.

 

Tags: