Belagavi

लिंगायत समाजाचे संघटन आवश्यक : डॉ. तोंटद सिद्धराम महास्वामी

Share

लिंगायत समाज संघटित झाला नाही तर त्यांना भविष्य नाही. सध्या सर्वांनी मतभेद विसरून संघटित होणे आवश्यक आहे. लिंगायत समाजाचे संघटन करणे राजकारणी, राजकीय व्यक्ती आणि राजकीय पक्षांना शक्य नाही. राजकारणाशी संबंध नसल्याच व्यक्ती समाज संघटन करू शकतात, असे मत गदग डुम्बळचे तोंटदार्य मठाचे जगद्गुरू डॉ. तोंटद सिद्धराम महास्वामींनी व्यक्त केले.

बेळगावमधील नागनूर रुद्राक्षी मठाच्या प्रांगणात जागतिक लिंगायत महासभा जिल्हा घटक आणि राष्ट्रीय बसव सेना बेळगाव जिल्हा घटक यांचा संयुक्त विद्यमाने संत बसवेश्वर जयंतीच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या बसव दर्शन कार्यक्रमात आयोजित केलेल्या प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते.

लिंगायत समाजाला संघटित करण्यात राजकारणाशी संबंधित असलेली व्यक्ती उपयोगी पडणार नाही. समाज संघटनेसाठी राजकारणाशी संबंध नसलेल्या व्यक्तींची गरज असून लिंगायत समाज किंगमेकर होण्यासाठी संपूर्ण लिंगायत समाजाने चिंतन करणे गरजेचे आहे, द्वेष आणि मतभेद बाजूला सारून आता साऱ्या समाजाने एकसंघ होणे आवश्यक असल्याचे मत स्वामींनी व्यक्त केले.

या समारंभाला इळकल्ली येथील चित्तरगी संस्थानामठाचे श्री गुरुमहंत स्वामीही उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, लिंगायत समाजाने मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणे गरजेचे आहे. ज्योतिषी गुलामगिरी, पंचाग गुलामगिरी, जन्म-मरणानंतर ज्योतिष्याचा आधार घेणे, लग्न समारंभासारख्या कार्यात विचारण्यात येणाऱ्या ज्योतिषी सल्ल्यातून बाहेर येणे आवश्यक आहे. संत बसवेश्वरांनी दिलेल्या वचन साहित्याचा अवलंब प्रत्येक लिंगायत समाजातील व्यक्तीने करावा, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जागतिक लिंगायत महासभेचे राष्ट्रीय प्रधान सचिव एस एम जामदार उपस्थित होते. यावेळी ते बोलताना म्हणाले, संत बसवेश्वरांच्या तत्वांचे पालन न करणारे लिंगायत होऊ शकत नाहीत. बसवेश्वर जयंती हा लिंगायत समाजाचा मोठा सण आहे. देवस्थान संस्कृती नाकारणारा धर्म लिंगायत आहे. तीर्थयात्रा आणि उपवास नाकारणाही धर्म लिंगायत आहे. लिंगायत समाज संघटित करणे हेच बसवेश्वर जयंती साजरा करण्यामागील उद्देश असल्याचे ते म्हणाले.

या कार्यक्रमात बेंगळुरू येथील डॉ. गुरुराज गोशेट्टी रचित सत्संग ग्रंथाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. यावेळी मम्मीगट्टी डॉ. बसवानंद महास्वामी, अथणी मोटगीमठचे श्री प्रभूचन्नबसव स्वामी, वाग्देवी ताई, डॉ. अल्लमप्रम्भू महास्वामी, बेळगाव कारंजीमठाचे डॉ. शिवयोगी देव, कित्तूर येथील विजय महंतदेव, दोटीहाळ येथील चंद्रशेखर देव, हलंगी येथील शिवानंद देव, श्री कुमुदिनीताई, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, अनिल बेनके, लिंगायत समाजाचे नेते बसवराज रोट्टी, शंकर गुड्स, बसवराज सुलतानपूर, एस एच सिदनाला, प्रेमाक्का अंगडी, सरला हेरेकर, विजयालक्ष्मी पुट्टी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: