Belagavi

बेळगावमध्ये ‘रमजान’ वर ‘ड्रोन’ ची नजर शांततेत रमजान साजरा करण्याचे आवाहन

Share

मुस्लिम धर्मीयांचा रमजान सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन शहर पोलीस आयुक्त डॉक्टर बोरलिंगय्या यांनी केले असून यादरम्यान विविध भागात ड्रोन च्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मुस्लिम धर्मीयांचा रमजान सण साजरा होत असून बेळगाव शहरात हा सण साजरा करताना शांततेत साजरा करावा, असे आवाहन शहर पोलीस आयुक्तांनी केले आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम नेते आणि जमात सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत ते बोलत होते.

रमजान सणाचे आचरण करताना शहरात शांतता राखावी, हा सण अत्यंत उत्साहाने आनंदाने साजरा करावा, यासाठी साऱ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. साऱ्याकडून सहकार्य मिळेल असा विश्वास देखील आहे. ज्यांच्याकडून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशांवर पोलिस विभागाच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला. शिवाय विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरात ड्रोन कॅमेरा च्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे अशी माहिती शहर पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

या बैठकीत बोलताना डीसीपी रवींद्र गडादि म्हणाले, रमजान सण आनंदात, उत्साहात आणि शांततेत पार पाडावा. या दरम्यान कोणतीही समस्या उद्भवल्यास त्वरित पोलिस विभागाशी संपर्क साधावा, कायदा कोणीही हातात घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी नगरसेवक अजीम पटवेगार बोलताना म्हणाले, काही विषयांमध्ये काही मुस्लिम नेत्यांची नावे पोलिसांच्या पुढे सांगून दिशाभूल करण्यात येते. यामुळे पोलिसांनी कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी यामागील सत्य जाणून घेऊन पुढील कारवाई करणे आवश्यक आहे. याआधी काही पोलिस अधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे आता उपलब्ध असलेल्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला सहकार्य हवे आहे असे आवाहन पटवेगार यांनी केले.या बैठकीला राजू सेठ, मुफ्ती मंजूर आलम, डीसीपी रवींद्र गडादी, डीसीपी पी व्ही स्नेहा, एसीपी चंद्रप्पा, एसीपी सदाशिव कट्टीमनी आदी उपस्थित होते

Tags: