Belagavi

   संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; मन्नोळकरांनी घेतली होती घराची जीपी

Share

 ठेकेदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. हिंडलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी पाटील यांच्या घराची जनरल पॉवर ऑफ ऍटर्नी घेतली होती असे तपासात पुढे आले आहे.

होय, मंत्री ईश्वरप्पा यांचा राजकीय बळी घेतलेल्या ठेकेदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी बेळगावात आलेल्या उडुपी  पोलिसांच्या पथकाने आज पाचव्या दिवशीही तपास सुरूच ठेवला. मृत संतोष पाटील यांच्या घराची जनरल पॉवर ऑफ ऍटर्नी हिंडलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर आणि ग्रापं सदस्य व उद्योजक एन. एस. पाटील यांनी घेतली होती, ती का घेतली होती असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

ठेकेदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी उडुपी पोलिसांनी हिंडलगा ग्रापंच्या पीडीओ वसंतकुमारी आणि माजी पीडीओ गंगाधर नाईक यांची गेल्या ३ दिवसांत कसून चौकशी चालवली आहे. हिंडलगा ग्रापं हद्दीत ४ कोटी रुपये खर्चातून करण्यात आलेल्या १०८ कामांची चौकशी करण्यात येत आहे. त्याशिवाय संतोष पाटील यांनी उपकंत्राट दिलेल्या १२ उपठेकेदारांची उडुपी पोलिसांनी चौकशी केली आहे. 

या दरम्यान, संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. हिंडलगा ग्रापं अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी संतोष पाटील यांच्या घराचे वटमुखत्यारपत्र घेतल्याचे ऐकिवात येत आहे. मन्नोळकर आणि ग्रापं सदस्य व उद्योजक एन. एस. पाटील यांनी दोघांनी मिळून संतोष पाटील यांच्या घराचे वटमुखत्यारपत्र घेतल्याची माहिती उडुपी पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.

या संदर्भात उडुपी पोलिसांना चौकशीवेळी माहिती देताना ग्रापं अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी संतोष पाटील यांच्या घराचे वटमुखत्यारपत्र घेतल्याची कबुली दिली, मात्र तो वेगळा व्यवहार आहे. १०८ विकासकामे, आत्महत्येचा त्याच्याशी काहीच संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.  या दरम्यान, कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी संतोष पाटील यांच्या कुटुंबीयांची, आईची त्यांच्या बडस येथील घरी भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून धीर दिला आहे. शिवकुमार यांनी संतोष यांच्या आईशी बोलताना, आम्हाला वेगळीच माहिती मिळाली आहे. संतोष यांना सब रजिस्ट्रार कार्यालयात घेऊन जाऊन जनरल पॉवर ऑफ ऍटर्नी नोंद करण्यात आली होती, कोणत्या प्रॉपर्टीची जीपीए घेण्यात आली याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. सरकार काय कारवाई करणार ती करू देत, तुम्ही धीराने रहा. तुमच्या घरातील मुले शिकलेली आहेत, ती कुणापुढे वाकणारी नाहीत, संतोष यांनी केलेल्या १०८ विकासकामांचे पुरावे, कागदपत्रे, फोटो आमच्याकडेही आहेत असे त्यांनी सांगितले. त्यावर हिंडलगा यात्रेपूर्वी लॉकडाउन होता. १ महिन्याच्या आत कामे पूर्ण केली पाहिजे असे सांगितले होते.

त्यानुसार एका महिन्यात सर्व कामे पूर्ण करेन असे माझा मुलगा संतोषने सांगितले होते. सरकारने बिले दिली असती तर माझ्या मुलाचा जीव वाचला असता असे संतोष यांच्या आई पार्वती यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितले.  त्यावर संतोष पाटील यांच्या आईचे डी. के. शिवकुमार यांनी सांत्वन केले. अधिकारी आम्ही कुठलेही काम-कंत्राट दिले नाही असे सांगत आहेत, पण तुमच्या घरी भेट दिलेल्या मंत्री मुरुगेश निराणी यांनी संतोषने केलेल्या कामाचे बिल द्यायला लावू असे म्हटले आहे. जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनीही संतोषने कामे केल्याचे कबूल केले आहे. एवढेच काय तुमच्या जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यानेही संतोषने कामे केल्याचे सांगितले आहे. या सगळ्यावर विचार करत आहोत, तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे शिवकुमार यांनी संतोष यांच्या आईला सांगितले.

 

Tags: