शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यात यावेत या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या आग्रहासाठी शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव होसूर येथील दक्षिण मतदार संघाचे आमदार अभय पाटील यांच्या घरासमोर शेतमालाची विक्री करत आंदोलन छेडण्यात आले.
११ ते १७ एप्रिल हा शेतकऱ्यांच्या विश्वासघाताचा सप्ताह म्हणून ठरविण्यात आला असून याअंतर्गत राज्यभरात संयुक्त आंदोलन कर्नाटक नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतीमालाला आधारभूत किंमत द्यावी, राज्य सरकारने कृषी विरोधी कायदे मागे घ्यावेत, तसेच बेळगावमध्ये निर्माण करण्यात आलेली खाजगी एपीएमसी रद्द करण्यात यावी, या आग्रहास्तव आमदारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन छेडण्यात आले.
बुधवारी ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन छेडण्यात आले होते. भारतीय कृषी समाजाचे राज्याध्यक्ष सिदगौड मोदगी यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन सरकारविरोधी घोषणा दिल्या. 
यासंदर्भात प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना सिदगौड मोदगी यांनी सांगितले कि, राज्य सरकारने अद्याप कृषी कायदे मागे घेतले नाहीत. हे कायदे त्वरित मागे घेण्यात यावेत, शेतमालाला आधारभूत किंमत ठरविण्यात यावी, अशी मागणी आपण वारंवार सरकार कडे करत आहोत. परंतु आमच्या मागण्यांना दाद देण्यात येत नसून आपण अशापद्धतीने आंदोलन छेदत असल्याचे ते म्हणाले.
या आंदोलनात शेतकरी नेते रवी पाटील, रमेश वाली, संतोष एच एम, शिवलीला मिसाळे, बी व्ही कुलकर्णी आदींसह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.


Recent Comments