मंत्री के ईश्वरप्पा यांच्या नावे सुसाईट नोट लिहून ठेकेदाराने आत्महत्या केल्याचे प्रकरण आज उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये भाजप नेत्यांच्या बैठकीदरम्यान हॉटेलला आप कार्यकर्त्यांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला आहे.

: बेळगावमधील ठेकेदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बेळगावमधील खाजगी हॉटेलमध्ये राज्य प्रभारी अरुण सिंग, माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजप जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आम आदमी पक्षाच्या राजू टोपणनवर यांच्या नेतृत्वाखाली आप कार्यकर्त्यांनी हॉटेलला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. संतोष पाटील यांच्या मृत्यूला राज्यातील भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप आप कार्यकर्त्यांनी केला आहे. मंत्री ईश्वरप्पा, माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, अरुण सिंग यांच्या विरोधात आप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
यावेळी बोलताना राजकुमार टोपाण्णावर म्हणाले, मृत संतोष पाटील हे आपले मित्र होते. भाजपासाठी आम्ही साऱ्यांनी मिळून काम केले होते. भाजप नेत्यांनी एका प्रामाणिक, निष्ठावंत, आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा खून केला आहे. मंत्री ईश्वरप्पा यांच्याविरोधात पंतप्रधानांना संतोष पाटील यांनी पत्र लिहिले. संतोष पाटील यांच्या आत्महत्येचा आपण निषेध करत असून याप्रकरणी ईश्वरप्पा यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी टोपाण्णावर यांनी केली.
भाजपच्या सुरु असलेल्या बैठकीदरम्यान आप च्या कार्यकर्त्यांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी घेराव घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी पोलिसांनी माळमारुती पोलीस स्थानकात अटक केलेल्या कार्यकर्त्यांची रवानगी करण्यात आली आहे. यादरम्यान आप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली.


Recent Comments