केंद्र सरकारच्या दरवाढीच्या धोरणाच्या निषेधार्थ काँग्रेसने देशव्यापी आंदोलन छेडले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेळगावात सोमवारी बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली.

होय, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, रासायनिक खतांसह जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत केंद्र सरकारने जबर वाढ केली आहे. कोरोनामुळे आधीच संकटात असलेल्या लोकांच्या जखमेवर यामुळे मीठ चोळल्यासारखे झाले आहे. त्यामुळे लोक केंद्र व राज्य सरकारच्या नावाने बोटे मोडीत आहेत. काँग्रेसनेही दरवाढीच्या निषेधार्थ देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. सोमवारी बेळगावातील चन्नम्मा चौकात आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. रिकामे गॅस सिलेंडर्स, ताटे-थाळ्या, तेलाचे रिकामी डबे हातात घेऊन कार्यकर्त्यांनी या निदर्शनात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे आ. लक्ष्मी हेब्बाळकरदेखील डोक्यावर गॅस सिलेंडर घेऊन या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. खिसेकापू सरकारचा निषेध असो आदी घोषणा देत यावेळी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. 
यावेळी आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात दरवाढीवरून जोरदार टीका केली. राज्यात व केंद्रात दोन्हीकडे भाजप सरकार असताना दरवाढीवर नियंत्रण आणले नाही. कोरोना संकटात अनेकांनी रोजगार गमावले आहेत. लघु उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे लोकांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. यावर उपाय न करता सांगायचे एक अन करायचे एक असे धोरण भाजपने स्वीकारले आहे अशी टीका त्यांनी केली.
आ. हेब्बाळकर पुढे म्हणाल्या, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर्स, जीवनावश्यक वस्तू, बस तिकीट अशा सगळ्यांचेच दर वाढले आहेत. यावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भलत्याच मुद्द्यांवर सरकार रान उठवत आहे. या दरवाढीविरोधात लोकांनी संघटितपणे आवाज उठवला, टाळ्या वाजवल्यावरच केंद्र सरकार जागे होणार आहे असे त्या म्हणाल्या. त्यानंतर चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. तेथे दरवाढ मागे घेण्याच्या मागणीचे सरकारच्या नावाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, प्रदीप एम. जी., परशुराम वग्गन्नावर, जयश्री माळगी, विजय हंपन्नावर आदींसह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाग घेतला.


Recent Comments