पत्रकारिता क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्याच्या चांगल्या हेतूने ज्येष्ठ पत्रकार, कर्नाटक श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे यांनी फौंडेशनची स्थापना केली ही स्तुत्य बाब आहे असे विचार माहिती व जनसंपर्क खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर यांनी व्यक्त केले.

बेळगावातील माहिती व जनसंपर्क खात्याच्या कार्यालयात आज, रविवारी अडचणीत असलेल्या पत्रकारांना एस. एस. फौंडेशनच्या वतीने मदत देण्याचा कार्यक्रम झाला. त्याचे उदघाटन केल्यावर बोलताना खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर म्हणाले, मुलाने चांगले काम केल्यावर समाजात त्याच्याबाबत चांगले बोलले जाते, त्यावेळी आईच्या आनंदाला पारावार रहात नाही. दिलीप कुरुंदवाडे यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ पत्रकारांच्या सेवेसाठी फौंडेशन सुरु करून निश्चितच चांगले कार्य केले आहे. अशा चांगल्या कामासाठी मी सदैव सहकार्य देईन. पत्रकारांचे त्रास, अडचणी पत्रकारांनाच चांगल्या माहित असतात. पुढील काळात अडचणीत असलेल्या पत्रकारांच्या अडचणी सोडविण्याचे चांगले काम या फौंडेशनकडून व्हावे अशा शुभेच्छा कडबूर यांनी यावेळी दिल्या.
एस. एस. फौंडेशनचे संस्थापक दिलीप कुरुंदवाडे यावेळी बोलताना म्हणाले, समस्या शोधताना, सोडविताना पत्रकारांना सुरक्षा मिळणे महत्वाचे आहे. आमच्या सुरक्षेबाबत आमचे कुटुंबीयच अधिक चिंतेत असतात. कुटुंबियांचे योगक्षेम विचारण्याचीही फुरसत आम्हाला आमच्या कामाच्या व्यापात नसते. माझ्या आईने पाहिलेल्या स्वप्नाप्रमाणे मी या फौंडेशनची स्थापना केली आहे. प्रजावाणीचे छायाचित्रकार कै. चेतन कुलकर्णी यांच्या धर्मपत्नीला किंडरगार्डन शाळा सुरु करून देण्याचा निर्धार केला आहे. मराठी वृत्तपत्राचे छायाचित्रकार कै. परशुराम गुंजीकर यांच्या धर्मपत्नीला राणी चन्नम्मा विद्यापीठात नोकरी मिळवून देऊन फौंडेशनतर्फे सहाय्य केले आहे. सहाय्य करणे मोठे काम नाही, पण पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना वेळ देणे महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.
फौंडेशनच्या समाजाभिमुख कार्याबद्दल प्रशंसा व्यक्त करून इन न्यूजचे प्रधान संपादक आणि श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजशेखर पाटील यांनी यावेळी एस. एस. फौंडेशनला ५१ हजार रुपयांची देणगी दिली. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळोजी पाटील, सरचिटणीस अरुण पाटील, श्रीकांत कुबकट्टी तसेच जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.


Recent Comments