Belagavi

बेळगावात धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता

Share

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या गेले संपूर्ण महिनाभर धर्मवीर बलिदान मास पाळण्यात आला. यानिमित्त फाल्गुन अमावस्येला धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली.

धर्मवीर संभाजी महाराजांना क्रूरकर्मा औरंगजेबाने फंदफितुरीने पकडून अनेक नरकयातना, यमयातना दिल्या. पायाच्या टाचेपासून खांद्यापर्यंत कुऱ्हाडीने तुकडेतुकडे करून, अत्यंत हालहाल करून संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली. त्यांची अंत्ययात्राही निघाली नाही. इतके दाहक आणि दिव्य बलिदान त्यांनी  अखंड हिंदू समाजासाठी दिले. याची जाणीव हिंदू समाजाला रहावी म्हणून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मूक पदयात्रा काढून संभाजी महाराजांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नी दिला जातो. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर यांच्याहस्ते करून मूक पदयात्रेला चालना देण्यात आली. ही मूक पदयात्रा एसपीएम रोड, शनीमंदिर, हेमूकलानी चौक, टिळक चौक येथून निघून रामलिंग खिंडमार्गे धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे पोहोचली. यावेळी धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला.

जिल्हाप्रमुख किरण गावडे यांच्याहस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, संभाजी महाराजांची प्रतिकात्मक चिता रचून, मंत्रोच्चार करून विधिवत पूजन करण्यात आले. तसेच त्यांना मंत्राग्नी देऊन त्यांच्या प्रतीकात्मक चितेचे दहन करण्यात आले. या चितेला अग्नी देण्यासाठी धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी श्रीक्षेत्र वढु बुद्रुक येथून ज्वाला प्रज्वलित करून आणली होती. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, उत्तरचे आमदार अनिल बेनके तसेच बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर यांनी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. वक्ते म्हणून कणबर्गी विभाग प्रमुख हिरामनी मुचंडीकर यांनी ‘धर्मवीर बलिदान मास का पाळावा तसेच आजचा हिंदु समाज’ या विषयावर मार्गदर्शन केले. गजानन निलजकर यांनी सर्व धारकऱ्यांना भारतमातेच्या रक्षणाची प्रतिज्ञा दिली. या संपूर्ण विधीचे पौराहित्य छत्रे गुरुजी यांनी केले. शेवटी ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

यावर्षी तब्बल 110 विभागात ज्वाला देण्यात आली. यात संपूर्ण तालुका तसेच सिंधुदुर्ग, डिचोली या भागातही ज्वाला पोहोचली. यावेळी शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, अजित जाधव, पुंडलिक चव्हाण, अनंत चौगुले, किरण बडवणाचे, अंकुश केसरकर, अतुल केसरकर, प्रमोद चौगुले, चंद्रशेखर चौगुले, उदित रेगे, अभिजित अष्टेकर, गजानन पाटील, गजानन पवार, अमोल केसरकर, वैभव धामनेकर, युवराज पाटील, भास्कर पाटील, व्यंकटेश पाटील, छत्रेगुरुजी, मोहन ओक, चैतन्य छत्रे, शंकर भातखंडे, जोतिबा चोपडे, शुभम मोरे, अभिषेक निलजकर, सागर मुतकेकर, अमित पेडणेकर, विजय कुंटे, प्रमिला पाटील, सुलोचना शिनोळकर, गौरी गवाने, वैष्णवी धामनेकर, मैथिली अनगोळकर तसेच शेकडो धारकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

 

 

Tags: