Belagavi

आरएलएस महाविद्यालयात ई-कामगार कार्ड जनजागृती कार्यक्रम

Share

बेळगावमधील आर एल एस महाविद्यालयात ई-कामगार कार्ड संदर्भात जनजागृती आणि नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आर एल एस महाविद्यालय, जिल्हा कायदा सेवा प्राधिकार आणि कर्मचारी विभागाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शनिवारी एम के नाम्बियार मोट कोर्ट हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास बेळगाव कर्मचारी विभागाचे उपयुक्त वेंकटेश शिंदीहट्टी, जिल्हा कायदा सेवा प्राधिकार दिवाणी न्यायाधीश विजय अरस हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए एच हवालदार हे अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक चेतन कुमार यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. यावेळी कामगारांना लेबर कार्ड संदर्भात जागृतीपर व्याख्यान देण्यात आले तसेच नोंदणीसंदर्भात माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमास उपस्थित असलेले न्यायाधीश विजय अरस बोलताना म्हणाले, सर्व कामगारांना प्रत्येक प्रकारची सुविधा मिळावी, ती कशी मिळवता येईल याची माहिती देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी कायदा सेवा प्राधिकारकडून हवे ते सहकार्य मिळेल. निरक्षर असलेल्या कामगारांनाही प्राधिकरमधील वकील मदत करतील, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना याचा अनुभव मिळावा, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

याचप्रमाणे बेळगाव कर्मचारी विभागाचे उपयुक्त वेंकटेश शिंदीहट्टी यांनी सांगितले कि, संघटित आणि असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र विभाग कार्यरत आहेत. सरकार संघटित तसेच असंघटित कामगारांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवत आहे. कामगारांसाठी लेबर कार्डचे वितरण करण्यात येत आहे. या कार्डच्या माध्यमातून कामगार आणि कामगारांच्या कुटुंबाला सर्व सुविधा मिळतात असे ते म्हणाले.

संघटित तसेच असंघटित कामगारांसाठी कामगार कार्ड सुरु करण्यात आले असून या संदर्भात जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ प्रत्येक कामगाराने घेऊन आपल्या कामगार कार्डसाठी आजच नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: