Belagavi

आदर्श शाळा सुरु करताना उत्तर कर्नाटकावर अन्याय नको : एच. के. पाटील

Share

राज्यात आदर्श शाळा सुरु करताना उत्तर कर्नाटकावर अन्याय करू नका, प्रत्येक ग्राम पंचायतीला एक आदर्श शाळा द्या अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एच. के. पाटील यांनी विधानसभेत आज सरकारकडे केली.

विधिमंडळ अधिवेशनात गुरुवारी विधानसभेत बोलताना एच. के. पाटील म्हणाले, हुबळीसाठी एक पब्लिक मॉडेल स्कूल मंजूर केल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. आमच्या तालुक्यात दोन सर्कल आहेत. गदग आणि हावेरी तालुक्यातही दोन सर्कल आहेत. प्रत्येक जिल्हा पंचायत क्षेत्राला एक आदर्श शाळा सुरु करा. एकेक तालुक्यात ७-८ सर्कल्स आहेत असे ते म्हणाले. यावेळी हस्तक्षेप करत सभापती विश्वेश्वर हेगडे-कागेरी म्हणाले, परिस्थिती सुधारल्यावर पुढे प्रत्येक ग्रापंला एक आदर्श शाळा सुरु करणार असे मंत्र्यांनी सांगितले आहे. आता 276 पब्लिक स्कूल्स सुरु केली आहेत. प्रति जिल्हा पंचायतीला एक शाळा सुरु केल्यास तेवढे आर्थिक बळही लागते. त्यामुळे कमी सर्कल्स असलेल्या तालुक्यात तरी विशेष प्रकरण म्हणून अतिरिक्त पब्लिक स्कूल्स सुरु करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी बोलताना आ. ए. एस. पाटील-नडहळ्ळी म्हणाले, आमच्या भागात सर्कल्सची संख्या कमी आहे. महसुली विभाग, तालुका-जिल्ह्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे सर्कलला एक आदर्श शाळा दिल्यास पुन्हा अन्याय होणार आहे. म्हणून प्रत्येक जिल्हा पंचायतीला एक आदर्श शाळा सुरु करावी अशी मागणी केली. यावेळी बोलताना आ. लिंगेश यांनी प्रत्येक सर्कलला एक आदर्श शाळा सुरु करण्याची मागणी केली. विधानसभा विरोधीपक्ष उपनेते यु. टी. खादर यांनी, जेथे मुलांची संख्या जास्त आहे तेथे त्याआधारे आदर्श शाळा सुरु करण्याची सूचना केली.   

या चर्चेला उत्तर देताना शिक्षणमंत्री बी. सी. नागेश म्हणाले, ज्येष्ठ सदस्यांनी केलेल्या सूचनेचा पुढे आदर्श शाळा सुरु करताना विचार केला जाईल. कर्नाटक पब्लिक स्कूल्स सुरु करताना लागणाऱ्या मूलभूत सुविधा, सहकार्य सरकार देईल. ही योजना दुहेरी आहे. आधी आदर्श शाळा सुरु करून नंतर त्यांचे कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये रूपांतर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

 

Tags: