बेळगाव मधील मध्यवर्ती कारागृहात मुख्य कारागृह अधीक्षक कृष्णा कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ते १४ मार्च अशा ७ दिवसासाठी पेंटिंग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

एशियन पेंट्स कलर अकादमी बेंगळूर यांच्या सहयोगाने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण शिबिराच्या सांगता समारंभास कलर अकादमीचे कार्यकारी अधिकारी मंजुनाथ हेगडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक अधीक्षक शहाबुद्दीन के हे होते.
यावेळी मंजुनाथ हेगडे बोलताना म्हणाले, एशियन कलर संस्थेतर्फे जनतेसाठी पेंटिंग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. मात्र कैद्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करणे हे हे आपल्यासाठी विशेष आहे. आयुष्यात काही कारणास्तव चूक झाल्याने कारागृहात याव्या लागलेल्या कैद्यांना भूतकाळ सोडून भावी आयुष्याला योग्य स्वरूप देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या ५० जणांना एशियन पेंट संस्थेच्यावतीने प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. महेश तळवार यांनी कन्नड गीत गायन करून उपस्थितांची मने जिंकली. प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांचा कारागृहाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी जेलर अभिषेक आणि राजेश धर्मट्टी तसेच जेलर वाय एस नायक आदी उपस्थित होते.


Recent Comments