शेतातील झोपडीला अचानक लागलेल्या आगीत 4 जनावरे होरपळून ठार झाली. ही हृदयद्रावक घटना गोकाक तालुक्यातील कोन्नूरच्या शेतवडीत घडली.

होय, गोकाक तालुक्यातील कोण्णूर गावाबाहेरील अर्जुन यमनाप्पा चिकालगुड्ड यांच्या शेतात असलेल्या झोपडीला मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे झोपडीत बांधलेल्या 2 म्हशी आणि 2 गायींचा होरपळून जागीच मृत्यू झाला. त्याशिवाय शेतात कष्टाने पिकवलेला झोपडीत साठवून ठेवलेला 10 पोती जोंधळा आणि शेतीची अवजारे आगीत भस्मसात झाली. त्यामुळे चिकालगुड्ड या गरीब शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकरी अर्जुन दररोज रात्री जनावरांना चारा घालून, पाणी पाजून कंदील लावून गावातील घरात जातात. काल रात्रीसुद्धा जनावरांना चारा-पाणी देऊन ते घरी गेले होते. त्यानंतर रात्री 11 च्या सुमारास त्यांच्या झोपडीला अचानक आग लागली. त्यात या दुभत्या जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत अर्जुन चिकालगुड्ड यांचे 4 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. याबाबत अर्जुन यांनी घटनेची माहिती दिली.
पै-पै जमवून, कर्ज काढून घेतलेल्या 4 दुभत्या जनावरांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याने या गरीब शेतकऱ्यावर आभाळ कोसळले आहे. सरकारने त्यांना योग्य भरपाई द्यावी अशी मागणी कोण्णूर ग्रामस्थांनी केली आहे.


Recent Comments