येत्या 14 मे रोजी भगवान महावीर यांची जयंती भव्य प्रमाणात साजरी करण्याची अनुमती देण्याच्या मागणीचे निवेदन बेळगावातील जैन समाजाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव मध्यवर्ती महासमितीच्या वतीने 14 मे रोजी भगवान महावीर जयंती भव्य प्रमाणात साजरी करण्याची अनुमती देण्याच्या मागणीचे निवेदन बेळगावातील जैन समाजाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रचार समितीचे अध्यक्ष कुंतीनाथ कलमनी म्हणाले, येत्या 14 मे रोजी भगवान महावीर यांची जयंती आहे. ती भव्य प्रमाणात साजरी करण्याचे आम्ही ठरविले आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आले आहे. गेली २ वर्षे कोरोना महामारीमुळे आम्हाला महावीर जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करता आली नव्हती. आता कोरोनाचा कहर कमी झाला आहे. त्यामुळे यंदा भगवान महावीर जयंती समस्त जैन समाज आणि मध्यवर्ती उत्सव समितीने भव्य प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम शिथिल करून आम्हाला अनुमती द्यावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. 
जन्मकल्याणक महोत्सव समितीचे सचिव राजेंद्र जैन म्हणाले, जैन समाजाचे आराध्य दैवत भगवान महावीर यांची जयंती उत्साहात भव्य प्रमाणात साजरी करण्याची अनुमती जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे. जन्मकल्याणक महोत्सव 5 ते 6 दिवस चालणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बेळगावात समस्त दिगंबर, श्वेतांबर, मूर्तिपूजक स्थानकवासी जैन समाज एकत्रितपणे महावीर जयंती उत्साहात साजरी करत आहेत. सर्व जाती-धर्माच्या अनुयायांनी महावीर जयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन जैन यांनी केले.
यावेळी हिराचंद कलमनी, पुष्पा कलमन्नावर, राजू पोरवाल, महेश पोरवाल, भरत पोरवाल, पोपटलाल संघवी यांच्यासह भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.


Recent Comments