Belagavi

पौरकार्मिकांकडून लाचेची मागणी; अधिकारी धारेवर

Share

निवृत्त पौरकार्मिकांकडून निवृत्तीवेतन, अल्पबचत आणि मालमत्ता खात्याचे सहायक संचालक लाच मागत असल्याचा आरोप ऐकिवात आहे. यावरून माजी नगरसेवक आणि सफाई कर्मचारी संघटनेचे नेते दीपक वाघेला यांनी या खात्याचे सहायक संचालकांना कपडे फाडून धडा शिकविण्याचा इशारा दिला.

: होय, मंगळवारी बेळगावातील निवृत्तीवेतन, अल्पबचत आणि मालमत्ता खात्याच्या सहायक संचालक कार्यालयात आलेल्या दीपक वाघेला आणि काही निवृत्त पौरकार्मिकांनी सहायक संचालक राजू नाईक यांना लाचखोरीवरून चांगलेच धारेवर धरले. ८ वर्षांपासून निवृत्त पौरकार्मिकांची कामे करून देत नाही म्हणजे काय? कोविडच्या लाटेत पौरकार्मिकांनी काम केले म्हणून तू जिवंत आहेस, त्यांच्या पुण्यामुळे या खुर्चीत बसला आहेस, पोटाला काय खातोस? असे एकेरी संबोधतच दीपक वाघेला यांनी राजू नाईक यांना फैलावर घेतले. यापुढे जर कोणाकडूनही पैसे घेतले, मागितले तर तुझे कपडे फाडून टाकीन असा दम वाघेला यांनी भरला.

यानंतर ‘आपली मराठी’ला याबाबत माहिती देताना दीपक वाघेला म्हणाले, श्रीपालम्मा देवय्या अब्राहम महापालिकेत पौरकार्मिक म्हणून सेवा बजावून निवृत्त होऊन दहा वर्षे झाली आहेत. अल्पबचत खात्यात त्यांनी बचत केलेले 6540 रुपये अतिरिक्त कापून घेण्यात आले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत तक्रार केली असता, हे पैसे परत करण्याचे कबूल केले होते. या घटनेला ६ महिने उलटले तरी अजून ते पैसे द्यायला तयार नाहीत. हे अधिकारी येथे आरामात बसून कागदपत्रे घेऊन धावपळ करायला लावतात. सरकार यांना काम केल्याचे वेतन देते. पण हे बेजबाब्दारीने काम करून लोकांना त्रास देत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा कर्तव्यच्युकर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना घरी पाठवून द्यायला हवे अशी मागणी वाघेला यांनी केली.

दीपक वाघेला पुढे म्हणाले, निवृत्त पौरकार्मिकांच्या फाईल क्लिअर करण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची लाच मागण्यात येत आहे. आता धारेवर धरल्यावर यापुढे पैसे घेणार नाही, फाईल क्लिअर करून येत्या शुक्रवारच्या आत अतिरिक्त कापून घेतलेले 6540 रुपये परत करण्याचे कबूल केले आहे. त्यामुळे आम्ही गप्प बसलो आहे. ट्रेझरी, महापालिका स्मॉल सेविंग्ज या सगळ्या कचेऱ्यांत अधिकारी लोकांकडून पैसे उकळत आहेत असा आरोप दीपक वाघेला यांनी केला.

दरम्यान, तुमचे काम करून देतो असे अधिकाऱ्याने कबूल केल्यानंतरच सफाई कर्मचारी नेते दीपक वाघेला माघारी परतले. आता कोणत्याही पौरकार्मिकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊनच अधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे हा संदेश या घटनेतून मिळाला आहे.

 

 

Tags: