Belagavi

बसवण्णा यांनी जगाला देवाचे खरे अस्तित्व दाखविले : डॉ. बसवानंद स्वामीजी

Share

जगज्योती बसवण्णा यांनी जगाला देवाचे खरे अस्तित्व, खरे स्वरूप दाखवून दिले असे विचार धारवाड जिल्ह्यातील मम्मीगट्टीचे डॉ. बसवानंद स्वामीजी यांनी सांगितले.

बेळगावातील महांत भवनात बुधवारी सायंकाळी जागतिक लिंगायत महासभा आणि राष्ट्रीय बसव सेनेच्या संयुक्त विध्यमाने अमावस्या शरण सत्संग कार्यक्रम पार पडला. प्रारंभी बसवण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रसाद दासोही संगप्पा आणि महानंदा मुसी दाम्पत्याच्या हस्ते षडस्थळ ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बोलताना मम्मीगट्टीचे डॉ. बसवानंद स्वामीजी म्हणाले, त्याकाळी माजलेले अंधश्रद्धा, रूढी परंपरांचे अवडंबर दूर जगाला भक्तीचा खरा मार्ग दाखवण्याचे काम बसवण्णा यांनी केले. आजही त्यांनी दाखविलेल्या भक्तिमार्गावरून वाटचाल करणे आपले कर्तव्य आहे. 

यावेळी व्याख्याते बाळेश बसरगी म्हणाले, आज एका वचनावर पीएचडी मिळू शकते इतकी वचनांमध्ये ताकद आहे. मग ही वचने लिहिलेल्याना कोणती पदवी देणार? नैतिक मूल्यांची शिकवण शरणांनी लिहिलेल्या वचनांमधून मिळते. माणसातील नैतिक शक्तीचा विकास होणे गरजेचे आहे. माणूस आणि समाज याना जोडणारा दुवा नैतिकता आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी खा. मंगल अंगडी, कन्नड साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षा मंगला मेटगुड यांचा सत्कार करण्यात आला. त्यासह राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेला अवनीश कोरीशेट्टी, अ. भा. शरण साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी निवडून आलेले अशोक मळगली यांचाही सत्कार करण्यात आला. उमा निजगुली व सहकाऱ्यानी वचने तर लिंगायत महासभेच्या महिला सदस्यांनी वचन प्रार्थना गायिली. याप्रसंगी लिंगायत नेते बसवराज सुलतानपुरी, बसवराज रोट्टी, शंकर गुडस, आडीवेश इटगी, चंद्रप्पा बुदीहाळ, प्रा. एम. आर. उल्लेगड्डी, राजू पद्मन्नावर,शिवानंद पाथरवाडी, नगरसेवक राजशेखर डोणी आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: