Gokak

सीआरपीएफ जवानाची मुलगीही अडकली युक्रेनमध्ये

Share

युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु झाले असून युक्रेनमध्ये भारतातील अनेक विद्यार्थी अडकून आहेत. यामध्ये कर्नाटकातील विद्यार्थ्यांचा समावेश असून बेळगावमधील विद्यार्थ्यंचीही संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत बेळगावमधील ७ विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली होती परंतु आता गोकाकमधील आणखी एका विद्यार्थिनीचे नाव वाढले असून बेळगावमधील अडकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८ वर पोहोचली आहे.

जगातील सर्वात मोठे राज्य म्हणून गणल्या जाणाऱ्या रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला आहे. दिवसेंदिवस युक्रेनमधील परिस्थिती गंभीर बनत चालली असून युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी भयावह परिस्थितीत दिवस काढत आहेत. आतापर्यंत ७ विद्यार्थी हे बेळगावचे असल्याची माहिती मिळाली होती परंतु आता बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील रझिया बागी या एका सीआरपीएफच्या जवानांच्या मुलीचीही यात नोंद झाली आहे. जाफ्रीजा स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनीने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून आपल्या पालकांशी संपर्क साधला असून युक्रेनमधून आपली लवकरात लवकर सुटका करावी, अशी विनंती केली आहे. यासीन बागी असे या सीआरपीएफ जवानांचे नाव असून सध्या ते दिल्ली येथे सेवा बजावत आहेत. आपल्याला सीमेपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करण्यात यावी, युद्धजन्य परिस्थितीमुळे आपल्याला पाण्याची आणि जेवणाचीही व्यवस्था मिळत नसल्याचे या विद्यार्थिनीने सांगितले आहे.

यासंदर्भात रझियाचे वडील यासीन बागी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले कि, आपली मुलगी युक्रेनमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रम शिकण्यासाठी गेली असून आतापर्यंत त्याठिकाणी कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. अचानक सुरु झालेल्या युद्धामुळे गेले दोन दिवस तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ज्याठिकाणी आपली मुलगी रहात होती त्याठिकाणी बॉम्बस्फोट झाला असून सध्या ती ज्या ठिकाणी थांबली आहे, तेथून सुखरूपपणे तिच्यासह इतर विद्यार्थ्यांना आणण्याची सोय केंद्र आणि राज्य सरकारने करावी, अशी मागणी यासीन बागी यांनी केली. (बाईट)

रझिया बागी हिच्यासह भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना सुखरूपपणे भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांचे पालक करत आहेत.

Tags: