रशिया–युक्रेनमधील युद्धाची झळ बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्याला बसली आहे. तालुक्यातील काही विध्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेत असल्याने त्यांच्या पालकांना मुलांची चिंता लागून राहिली आहे.

युक्रेनमध्ये उच्च शिक्षणासाठी कर्नाटकातून गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गोकाक तालुक्यातील घटप्रभा येथील अमोघा चौगला हीसुद्धा एक आहे. तुक्यानट्टी येथील कृषी केंद्रात वैज्ञानिक म्हणून काम करणारे धनंजय चौगला यांची ती मोठी मुलगी आहे. अमोघा युक्रेनमधील कार्की शहरातील कार्की नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीत वैद्यकीय शिक्षण घेत आहे. ती सुखरूप असली तरी रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे तिच्या पालकांना तिची काळजी लागून राहिली आहे. याबाबत बोलताना तिचे वडील धनंजय चौगला यांनी सांगितले की, माझी मुलगी अमोघा जिथे आहे तेथे तसा त्रास नाही. कारण तिच्यासोबत तिचे सहपाठी विध्यार्थी आहेत. त्याशिवाय भारतीय राजदूतावासाकडूनही भारतीय विध्यार्थ्यांना कसला त्रास होऊ नये याची दक्षता घेण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे. त्याशिवाय बेळगावचे जिल्हाधिकारीही आमच्या संपर्कात आहेत, ते अमोघाबाबत वरचेवर माहिती घेत आहेत. 
परदेशात मिळणारे उच्च शिक्षण सरकारने कमी खर्चात आपल्या देशातच उपलब्ध करून द्यावे असे आवाहन करताना धनंजय चौगला म्हणाले, एमबीबीएस सारखे उच्च शिक्षण सरकारने आमच्या देशातच कमी खर्चात उपलब्ध करून दिले तर भारतीय विद्यार्थ्यांवर ही वेळ येणार नाही, शिवाय कमी खर्चातच देशातील ग्रामीण भागात डॉक्टर्स उपलब्ध होतील. पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे असे त्यांनी सांगितले.
एकंदर, युद्ध स्थितीतही अडकून पडलेली गोकाकची विद्यार्थिनी सुरक्षित असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अशा अडकून पडलेल्या भारतीय विध्यार्थ्यांना सुरक्षित परत आणणार असल्याचे सरकारनेही सांगितले आहे. युद्धाचे ढग लवकर दूर व्हावेत आणि भारतीय विध्यार्थी सुरक्षित देशात परतावेत हीच सगळ्यांची अपेक्षा आहे.


Recent Comments