Gokak

शिवमोगा हत्या प्रकरणाचा गोकाकमध्ये निषेध

Share

शिवमोगा येथे बजरंग दलाच्या हर्ष नामक कार्यकर्त्याच्या झालेल्या हत्येचा निषेध करत गोकाक येथील बसवेश्वर चौकात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले.

शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गोकाक मध्ये आंदोलन छेडण्यात आले. यावेळी गोकाकच्या तहसीलदारांना गोकाक तालुका घटक श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले.

राज्यात कुणाचेही सरकार असले तरी हिंदूंच्या हत्या होत असून केवळ खुर्चीच्या राजकारणामुळे हे सर्व घडत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी सदर हत्येचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. खुर्चीच्या राजकारणासाठी हिंदूंचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप करत बसवेश्वर सर्कल येथे जवळपास एक तासाहून अधिक काळ हिंदू कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी आसपास परिसरातील सर्व व्यवहार बंद होते.

यासंदर्भात बोलताना श्रीराम सेना तालुका घटक अध्यक्ष रवी पुजेरी म्हणाले, आम्ही हिंदुत्ववादी नसून आम्ही गोडसेवादी आहोत. यापुढील काळात असेच प्रकार घडत राहिले तर आम्ही शांत बसणार नाही. हा सारा प्रकार थांबणे आवश्यक असून सरकारने समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते पाऊल उचलणे गरजेचे आहे. अशाप्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून हिंदूंवर हल्ले करून हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

या आंदोलनात शेकडोंच्या संख्येने श्रीराम सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: