Belagavi

हंचीनाळ के. एस. येथे जिल्हाधिकाऱ्यांचे ग्रामवास्तव्य

Share

प्रत्यक्ष गावाला भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी शनिवारी निपाणी तालुक्यातील हंचीनाळ के. एस. येथे ग्रामवास्तव्य केले

होय, हंचीनाळ के. एस. येथे अधिकाऱ्यांच्या पथकासह जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांचे एका विशेष बसमधून शनिवारी आगमन झाले. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे अत्यंत उत्साहात स्वागत केले. जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील ब्रह्मनाथ मंदिराला भेट देऊन देवदर्शन घेतले. या ठिकाणी त्यांनी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गावात संचार केला. एससी कॉलनीतील प्रत्येक घराला भेट देऊन तेथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.

हरिजन केरी, वड्डर गल्लीत वही आणि पेन हाती घेऊन दारी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचे महिलांनी औक्षण केले. रस्ते, पाणी आदी नागरी सुविधा पुरविण्याची मागणी त्यांच्याकडे केली. त्याचप्रमाणे घरे जीर्णावस्थेत असल्याने घरे बांधून देण्याची मागणीही महिला व रहिवाशांनी केली.

त्यानंतर जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी अंगणवाडी केंद्राला भेट देऊन तेथील मुलांना चॉकलेट्स वाटली. यावेळी त्यांनी अंगणवाडी कार्यकर्त्यांची विचारपूस केली. मुलांना उत्तम सुविधा पुरविण्याची सूचना त्यांना केली. यावेळी मुलांनी त्यांना आपण शिकलेली गाणी गाऊन दाखवली. त्याला टाळ्या वाजवत जिल्हाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, प्रांताधिकारी संतोष कामगौडा, कृषी सहायक संचालक शिवनगौडा पाटील, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे संयुक्त संचालक सी. बी. कोडली, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, माहिती खात्याचे उप संचालक गुरुनाथ कडबूर, तहसीलदार मोहन भस्मे, महिला व बालकल्याण खात्याचे उप संचालक बसवराज वरवट्टी यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

 

 

Tags: