Belagavi

बेळगुंदी रस्त्याच्या कामकाजाला लक्ष्मी हेब्बाळकरांच्या हस्ते प्रारंभ कामकाजाला प्रारंभ करून विरोधकांना दिले प्रत्त्युत्तर

Share

बेळगाव ग्रामीण मतदार संघातील रस्त्याच्या कामकाजासंदर्भात भाजप सरकार विरोधात भाजप सरकारच उभे होते. मात्र इतके वाद होऊनही एकट्यानेही काम केले नाही. त्यांचेच सरकार आणि त्यांचेच खासदार असूनही रस्त्याचे काम रखडले. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अनुदानातून या कामकाजाला सुरुवात करून विरोधकांना प्रत्त्युत्तर दिले आहे.

बेळगुंदी येथील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात भाजप नेत्यांनी आंदोलने केली. या विषयावर अनेक चर्चा रंगल्या. या रस्त्याच्या कामकाजाला अखेर मुहूर्त लागला असून मंगळवारी पीडब्ल्यूडी, पीआरडी, आमदार निधीतून एकूण ३ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करून महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या राकसकोप, सुतगट्टी येथील रस्ते कामकाजाचे भूमी पूजन करण्यात आले.

या रस्त्याच्या कामकाजाचे उद्घाटन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार हेब्बाळकर म्हणाल्या, अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम रखडले होते. पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. अनुदानाभावी काही काम शिल्लक होती. अनेकांनी राजकीय विरोध केला. त्यांचेच सरकार असूनही त्यांच्याच सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले. या भागात देखील त्यांचीच सत्ता आहे. परंतु शासनात कार्यरत असलेल्या मंत्र्यांच्या भेटी घेऊन माझ्या मतदार संघातील अडचणी त्यांना सांगून ३ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करून घेण्यात आले आहे, असे त्या म्हणाल्या.

आमदार हेब्बाळकर पुढे म्हणाल्या, बेळगुंदी गावचा अजून खूप विकास करायचे माझे स्वप्न आहे. सुमारे ८ कोटी रुपयांच्या अनुदानातून अनेक विकासकामे राबवायची आहेत. बेळगुंदी जिल्हा पंचायत व्याप्तीत येणाऱ्या सर्व गावांचा विकास करण्याचा प्रयत्न मी करेन, असे आश्वासन त्यांनी दिले.

मुख्यमंत्री भरपाई निधीतून आरोग्य चिकित्सेसाठी प्रत्येक आठवड्यात धनादेश वितरित करण्यात येत होते. परंतु दोन आठवडे गोव्याच्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याने हे काम थांबले आहे. या आठवड्यात २३ लाख रुपयांचे २५ धनादेश आले आहेत. उद्या किंवा परवा विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, युवराज कदम, आणि काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत हे धनादेश वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष यल्लाप्पा ढेकोळकर यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Tags: