बेळगावातील बॉंक्साईट रोडवरील उषा कॉलनीतील श्री महालक्ष्मी देवस्थानात लोककल्याणासाठी करण्यात येत असलेल्या होमहवन कार्यक्रमात भाजप राज्य उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी सहभाग घेतला.
उषा कॉलनीतील महालक्ष्मी मंदिराच्या १२व्या यात्रोत्सवानिमित्त मोफत सामूहिक विवाह आणि लोककल्याणासाठी करण्यात येत असलेल्या होमहवन कार्यक्रमात भाजप राज्य उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी सहभाग घेतला.
हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या कार्यक्रमात कारंजीमठाचे गुरुसिद्ध स्वामीजी, यर्नाळचे ब्रह्मानंद अज्जा, मुरगोडचे नीलकंठ महास्वामीजी, घटप्रभाचे मल्लिकार्जुन महास्वामीजी बीदरच्या गुरुदेव आश्रमाचे गणेशानंद महास्वामीजी यांनी सहभाग घेतला. यावेळी भाजप राज्य उपाध्यक्ष विजयेंद्र यांनी विशेष पूजा केली. मंदिर समितीच्या वतीनं विजयेंद्र यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विजयेंद्र म्हणाले, शिवमोग्गा येथे हिजाबवरून दगडफेक आणि गणवेश घालण्यावरून विद्यार्थ्यांची डोकी भडकावण्यात विरोधी पक्षाचा हात आहे. हिजाबबाबत हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. सरकारने हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे सूचना दिली आहे. सर्वानी समाधानाने रहावे. मुलांच्या मनात विष बीज पेरण्याचे दुष्कृत्य विरोधी पक्ष करत आहे. हायकोर्टाचा निकाल आल्यावर सगळे काही ठीक होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हिजाब विरुद्ध भगवा या वादाने राज्यातील शांतता बिघडवली आहे. राज्यभरात हा वाद पेटत चालला आहे. न्यायालयाच्या निकालानंतरच तो शांत होईल असे विजयेंद्र म्हणाले.


Recent Comments