राज्यात कोविडच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून सध्या कोविड टेस्ट करणाऱ्यांची संख्यादेखील सरासरीपेक्षा दुप्पट होत चालली आहे. परंतु हुबळी येथील किम्स रुग्णालयात मात्र कोविड रिपोर्ट येण्यासच विलंब होत असल्याने कोविड लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांमध्ये भीती वाढत चालली आहे.
मागील एक आठवड्यापासून कोविड रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच शासनाने कोविड टेस्ट अनिवार्य केली असून या पार्श्वभूमीवर उत्तर कर्नाटकची संजीवनी मानल्या जाणाऱ्या किम्स रुग्णालयात कोविड टेस्ट करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. परंतु किम्स मधील सर्व्हर डाऊन असल्याकारणाने कोविड टेस्टचे रिपोर्ट येण्यास विलंब होत असल्याने जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
धारवाड जिल्हा प्रशासनाने कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन कोविडच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात पूर्व खबरदारी आणि उपाययोजना आखण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. कोविड टेस्ट संख्या अधिक होत असून किम्स मध्ये सर्व्हर डाऊन समस्येमुळे रिपोर्ट मिळण्यास विलंब होत असल्याचे जिल्हा पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. दररोज 4000 हुन अधिक टेस्ट करण्यात येत असून यादरम्यान सर्व्हर डाऊन असल्याने ही समस्या उद्भवली आहे अन्यथा वेळेत कोविड रिपार्ट मिळत असल्याचे ते म्हणाले.
अनेक महत्त्वाच्या ठिकाणी आरटीपीसीआर रिपोर्ट अनिवार्य करण्यात आला असून, प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने हे रिपोर्ट तात्काळ जनतेला मिळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
Recent Comments