कन्नड संघटनांच्या आजच्या ‘कर्नाटक बंद‘च्या पार्श्वभूमीवर बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या कार्यालयांना पोलीस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

व्हॉईस : बेंगळुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची समाजकंटकांनी १६ डिसेंबरला विटंबना केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद बेळगावात उमटले होते. त्यादिवशी रात्री महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील धर्मवीर संभाजी चौकात जमून या घटनेचा निषेध केला होता. त्यावेळी काही समाजकंटकांनी सरकारी व खासगी वाहनांवर दगडफेक केली होती. दुसऱ्या दिवशी पोलिसांचा विरोध झुगारून देत छत्रपती शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून पुतळा विटंबनेचा निषेध केला होता. त्यानंतर अनगोळमधील कनकदास नगरातील क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याची समाजकंटकांनी विटंबना केली होती. या सगळ्याचा ठपका ठेवत म. ए. समितीच्या आणि शिवसेनेच्या ३८ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. समिती-शिवसेनेवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी कन्नड संघटनांनी थयथयाट करत आज कर्नाटक बंदची हाक दिली होती. बंद यशस्वी होणार नसल्याने काही कन्नड संघटनांनी त्यातून अंग काढून घेतले होते. तर मुख्यमंत्री बोम्मई यांच्या आवाहनानुसार वाटाळ नागराज व अन्य कन्नड नेत्यांनी कालच बेंगळुरात बंद मागे घेत असल्याची घोषणाही केली आहे.
तरीही खबरदारी घेत अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी आज समितीच्या कॉलेज रोडवरील तालुका कार्यालय, रामलिंगखिंड गल्लीतील मुख्य कार्यालय आणि शिवसेनेच्या कोनवाळ गल्लीतील मुख्य कार्यालयाला पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून कसलीही आगळीक घडू नये यासाठी ही सावधगिरी बाळगण्यात आली आहे. पोलीस वाहन आणि शिपाई तैनात करण्यात आले आहेत.


Recent Comments