Belagavi

रजेवर आलेल्या जवानाचा संशयास्पदरित्या मृत्यू

Share

रजेवर आलेल्या जवानाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला असून सदर जवानाचा मृतदेह सापडला असल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हिरुर या गावात घडली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हिरुर या गावातील इराप्पा पुजारी नामक जवान आपल्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी रजेवर आला होता. २ डिसेंबर रोजी रजेवर आलेल्या सदर जवान आपल्या बहिणीच्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी २५ डिसेंबर रोजी सायंकाळी घराबाहेर पडला होता. त्या रात्री घरी न परतल्याने गावात शोधाशोध करण्यात आली. पहाटे गावाच्या बाहेरील परिसरात या जवानाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर जवानाच्या डोक्यावर जोरदार घाव मारून मृतदेह एका ओसाड विहिरीत फेकून देण्यात आला आहे. हा मृत्यू नसून घातपाताने खून करण्यात आल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

बहिणीच्या मुलीच्या लग्नात हिरीरीने भाग घेण्यासाठी आलेल्या जवानाच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंब शोकाकुल वातावरणात आहे. जवानाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हारुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर हा मृत्यू आहे कि खून हे स्पष्ट होणार आहे. जवानाच्या कुटुंबीयांनी मात्र हा खून असल्याची खात्री व्यक्त केली असून पोलिसांनी त्वरित तपास करून खुन्याला अटक करण्याची मागणी केली आहे.  सदर प्रकरण मुनवळ्ळी पोलीस स्थानकात नोंद करण्यात आले असून शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतर या प्रकरणाचा उलगडा होईल.

 

 

 

Tags: