Belagavi

हिरेबागेवाडी टोल नाक्यावर करवेची निदर्शने

Share

बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात जोरदार निदर्शने करत कर्नाटक रक्षण वेदिकेने आंदोलन छेडले. बेळगाव सुवर्णसौधला घेराव घालण्याच्या हेतूने छेडण्यात येत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी पांगवले.

हिरेबागेवाडी टोल नाक्याजवळ आंदोलकांची जोरदार निदर्शने सुरू असताना पोलिसांनी त्यांना अडविले. यामुळे पोलीस आणि करवे कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

करवे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू ठेवले. क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आल्याचा आरोप करत समिती आणि शिवसेना विरोधात कारवाई करण्याची मागणी करत निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांवर दबाव आणण्यात येत असून याविरोधात करवे चे प्रवीण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले.

बेळगाव शहर आणि तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे आंदोलनांना परवानगी देण्यात आली नसून यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात झालेल्या झटापटीत एक आंदोलक जखमी झाला. तात्काळ त्या आंदोलकाची रुग्णालयात रवानगी करण्यात आली आहे. यानंतर इतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

यावेळी बोलताना करवे राज्याध्यक्ष प्रवीण शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारशी चर्चा करून महाराष्ट्र सरकार बरखास्त करावे. कर्नाटकात असे प्रकार घडणे बंद न झाल्यास नक्की रक्तपात होईल, अशी धमकी देखील प्रवीण शेट्टी यांनी दिली. शिवाय ज्याप्रमाणे मराठी भाषिकांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रेम आहे त्याचप्रमाणे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचेही कन्नड भाषिकांबाबत मत असावे, असा आग्रहदेखील शेट्टी यांनी केलाय.

बेंगळूर प्रकरणानंतर सम्पूर्ण राज्यभरात आणि महाराष्ट्रात पडसाद उमटू लागल्यानंतर कर्नाटकातील करवे संघटनेने समिती आणि शिवसेने विरोधात निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. असेच प्रकार घडत राहिल्यास रक्तपात होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Tags: