बेंगळुरातील सदाशिवनगरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची समाजकंटकांनी विटंबना केली आहे. त्याचे तीव्र पडसाद आज बेळगावात उमटले. शिवप्रेमींनी समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केले. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, समाजात अशांतता पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बेंगळुरातील सदाशिवनगरातील पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केल्याचे काल उघडकीस आले. त्याचा देशभरात निषेध केला जात आहे. त्याचे तीव्र पडसाद बेळगावातही उमटले. महाराष्ट्र एकीकरण समितीसह हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी गार्डनजवळ जमून या घटनेचा तीव्र निषेध केला. राष्ट्रपुरुष छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
माजी उपमहापौर व म. ए. समितीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, शिवाजी सुंठकर, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडूसकर आदींच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन करून या घटनेचा निषेध केला. दरम्यान, छत्रपती शिवाजी उद्यानात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यासाठी कार्यकर्ते उद्यानात जात असताना पोलिसांनी त्यांना मनाई केली. त्यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचा विरोध झुगारत उद्यानात प्रवेश करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करून पूजा केली.
दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना आणि बेळगावात झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध केला आहे. यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.


Recent Comments