Vijayapura

बागलकोट – विजापूर परिषदेचा निकाल; भाजपचा निसटता विजय

Share

बागलकोट विजापूर जिल्ह्यातील विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीच्या निकालात अपेक्षेप्रमाणे काँग्रेस आणि भाजपचा विजय झाला आहे. मात्र या दोन्ही जिल्ह्यात भाजपाला म्हणावा तसा प्रतिसाद मतदारांनी दिला नसून डबल इंजिन सरकार असूनही मतदारांनी दिलेला प्रतिसाद हा विचार करण्यासारखा आहे…

राज्यात आणि केंद्रात देखील असलेले भाजपचे सरकार, भाजपच्या बाबतीत असलेली मोदी लाट, प्रसारमाध्यमांवर मिळत असलेला प्रतिसाद या साऱ्या परिस्थितीला पाहता विधान परिषद निवडणुकीत भाजपाला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. भाजपचा प्रचार आणि प्रचाराची पद्धत पाहता तसेच मतदारांचा मिळत असलेला पाठिंबा पाहता या निवडणुकीत मात्र भाजपचा अपेक्षा भंग झाल्याचे चित्र दिसून आले.

बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यात दोन खासदार भाजपचे आहेत. एक विधान परिषद सदस्य तर सात आमदार देखील आहेत. परंतु नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत मात्र भाजपाला म्हणावा तसा कौल मतदारांनी दिला नसल्याचे दिसून आले. अपेक्षेपेक्षा काँग्रेस उमेदवार आणि माजी मंत्री आणि सध्याचे आमदार डॉ. एम. बी पाटील यांचे बंधू सुनीलगौडा पाटील यांना मतदारांनी प्रथम पसंतीची मते देऊन विजयी केले. याच मतदार संघात भाजपचे उमेदवार पी. एच. पुजारी यांना मात्र प्रथम पसंतीची मते अत्यंत कमी मिळाली आहेत. तर दुसऱ्या फेरीत अपक्ष उमेदवार मल्लिकार्जुन लोणी यांनी जोरदार मतांनी निवडणूक जिंकली. यादरम्यान भाजपने दाखविलेल्या शक्तिप्रदर्शनावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काँग्रेसचे उमेदवार पी. एच. पुजार यांनी आपल्या विजयाबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे, ते पाहुयात….

या विधानपरिषद निवडणुकीत जातीपातीचे आणि पैशांचे राजकारण करण्यात आल्याची माहिती समोर आली असली तरी आपण मात्र या शीतयुद्धाच्या साऱ्यांच्या सहकार्याने आणि साऱ्यांच्या आशिर्वाने विजय मिळविला असल्याची टिप्पणीही पी. एच. पुजार यांनी केली आहे. जमखंडीचे माजी आमदार श्रीकांत कुलकर्णी आणि विजापूरचे माध्यम प्रमुख विजय जोशी यांच्या उपस्थितीत पुजार यांनी साधेपणात विजयोत्सव साजरा केला.

विधान परिषद निवडणुकीत इतर निवणुकांप्रमाणेच आपला विजय होईल, असा विश्वास बाळगून असलेल्या भाजपचा अनेक ठिकाणी हिरमोड झाला आहे. भाजपच्या पराभवामुळे पदाधिकाऱ्यांमध्येच उलट सुलट चर्चा सुरु आहेत. आगामी निवडणुकीच्या निकालावर या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम होण्याची शक्यता खुद्द पदाधिकाऱ्यांमधूनच व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: