धर्मांतर बंदी कायद्याविरोधात आज भाजप विधिमंडळ गट बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी सांगितले.

बेळगावात बुधवारी पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले, कोणतेही विधेयक सभागृहात मांडण्यापूर्वी स्वपक्षीय आमदारांना त्याचिया संपूर्ण माहिती देणे गरजेचे असते. त्यामुळे आज होणाऱ्या भाजप विधिमंडळ गट बैठकीत पक्षाच्या सर्व आमदारांना धर्मांतर विरोधी कायद्याची संपूर्ण माहिती देण्यात येईल. त्यावर सांगोपांग चर्चा करून मगच ते सभागृहात मांडण्यात येईल.
विधान परिषद निवडणुकीत पक्षाचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांचा पराभव आणि लखन जारकीहोळी यांच्या विजयाबाबत कोणावर कारवाई करणार या प्रश्नावर गृहमंत्री म्हणाले, घाई-गडबडीत असे निर्णय घेता येत नाहीत. पक्ष यावर योग्य निर्णय घेईल.
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात दीपक दळवी याना काळे फासल्यावरून कन्नड कार्यकर्ता संपत देसाई याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविल्याबाबत बोलताना गृहमंत्री म्हणाले, याबाबत काहींनी माझ्याशी चर्चा केली आहे. या घटनेची माहिती मला त्याचदिवशी मिळाली होती. याबाबत पोलीस कारवाई करणार आहेत. बेळगावात मराठी आणि कन्नड भाषिक सौहार्दाने रहात आहेत. काही विघ्नसंतोषी लोक वातावरण बिघडवीत आहेत. परवानगी नसताना महामेळावा घेतल्याबद्दल पोलीस कारवाई करणार आहेत असे ते म्हणाले.
पोलीस दलातील सुधारणांबाबत दिलेला औरादकर अहवाल संभाव्य स्वरूपाचा आहे. अहवाल लागू झाल्यावर राज्यातील पोलिसांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत असे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी सांगितले.


Recent Comments