मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना कालच्या महामेळाव्यात गुंड प्रवृत्तीच्या कन्न्डपर कार्यकर्त्यांनी काळे फासल्याच्या निषेधार्थ आज बेळगाव शहरात व ग्रामीण भागात स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात येत आहे.

कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो येथे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सोमवारी महामेळावा घेण्यात आला. त्यावेळी कर्नाटक नवनिर्माण वेदिकेच्या संपतकुमार देसाई या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्याने पोलीस संरक्षणात दीपक दळवी यांच्यावर काळी शाई फेकली होती. त्याच्या निषेधार्थ समितीने आज ‘बेळगाव बंद’ची हाक दिली आहे.
या हाकेला बेळगाव शहरासह ग्रामीण भागातही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बेळगावातील रविवारपेठ, बापट गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार आदी भागात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून बंद पाळला. समितीच्या हाकेला ओ देत अन्य भागातील व्यवसायिकांनीही व्यवहार बंद ठवून बंदमध्ये सहभाग घेतला.
बेळगाव शहराप्रमाणेच येळ्ळूर, कंग्राळी खुर्द व बुद्रुक, देसूर, बेळगुंदी, सुळगा, आंबेवाडी, मन्नूर, उचगाव, वाघवडे आदी भागातही स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी बंद पाळत मराठी बाणा दाखवून दिला. अनेक ठिकाणी खासगी वडाप वाहने बंद ठेवण्यात आली.
दरम्यान, समितीच्या बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अद्याप तरी कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही.


Recent Comments