Belagavi

कर्मयोगी डॉ. शिवबसव महास्वामींच्या पुतळ्याचे अनावरण

Share

कर्मयोगी, शतायुषी नागनूर रुद्राक्षी मठाचे परमपूज्य डॉ. शिवबसव महास्वामी यांच्या नव्या आणि भव्य मूर्तीचा अनावरण सोहळा नुकताच पार पडला.

बेळगावच्या नागनूर रुद्राक्षी मठाच्या प्रांगणात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या डॉ. शिवबसव महास्वामींच्या ७ फुटी मूर्तीचे अनावरण करण्यात आले असून सिरिगेरे महासंस्थान मठाचे जगद्गुरू डॉ. शिवमूर्ती शिवाचार्य महाद्वामींच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. गदग – डंबळचे डॉ. तोंटद सिद्धराम महास्वामी यांच्यासह अनेक स्वामींच्या दिव्य सानिध्यात हा कार्यक्रम पार पडला.

राणी चन्नम्मा चौकापासून डॉ. शिवबसव महास्वामींच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत जानपद कलासंघ, १२ व्या शतकातील अनुभव मंटपचे रूपक, अश्वावरील शिवबसव महास्वामींची प्रतिमा घेऊन सहभागी झालेले युवक, कन्नड गीतांवर ठेका धरलेले श्री मठाचे विद्यार्थी आदी या मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते. श्री मठाच्या महिला भक्तांनी लिंगायत धर्मग्रंथ आपल्या डोक्यावर ठेऊन या मिरवणुकीत सहभाग घेतला.

या मिरवणुकीनंतर डॉ. शिवबसव महास्वामींच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. एकीकडे विश्वगुरू बसवण्णा यांची प्रतिमा तर दुसरीकडे हनगल कुमारस्वामींची प्रतिमा या दोन्ही प्रतिमांच्यामध्ये डॉ. शिवबसव महास्वामींची मूर्ती अत्यंत सुंदर पद्धतीने बसविण्यात आली आहे. या अनावरण सोहळ्याप्रसंगी डॉ. तोंटद सिद्धराम महास्वामी उपस्थितांना उद्देशून म्हणाले, सीमाभागात सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अद्भुत कार्य केलेले डॉ. शिवबसव महास्वामी १९९० मध्ये बेळगाव मनपाच्या वतीने शतक महोत्सवाच्या निमित्ताने मूर्तीचे अनावरण करण्यात आले होते. या मूर्तीसाठी आता मंडपाची निर्मिती करण्यात आली असून त्याचठिकाणी ७ फुटी मूर्ती उभारण्यात आल्याचे ते म्हणाले. राज्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याच्या गौरवासाठी या मूर्तीच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी हालकेरे येथील मुप्पीन बसवलिंग महास्वामी, नांगनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू स्वामी, अथणी मोटगीमठचे प्रभू चन्नबसव स्वामी, कारंजामठाचे गुरुसिद्ध स्वामी, कित्तूर कलमठचे महिवाल राजयोगीन्द्र स्वामी, कडोलीचे गुरु बसवलिंग स्वामी, हंदिगनूर येथील शिवानंद स्वामी, शेगुणसी येथील महंत देव, मुख्यमंत्र्यांचे आप्तसचिव गिरीश होसूर, लिंगायत नेते बसवराज रोट्टी, शंकर गुडस, सतीश चौगुला, शिवानंद वागरमरडी आदींसह श्रीमंत शिक्षण संस्थेचे कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: