रोटरी हॅपी स्कुल आणि लेकव्ह्यू फौंडेशनच्या वतीने बेळगावात आज हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. या मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद मिळाला.

काहीसे थंड हवामान आणि कुंद वातावरणात बेळगावात रविवारी सकाळी बेळगाव हाफ मॅरेथॉन शेकडो धावपटूंच्या सहभागाने उत्साहात पार पडली. आ. अनिल बेनके, मराठा इन्फन्ट्रीचे ब्रिगेडियर, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, डीसीपी डॉ. विक्रम आमटे आदी मान्यवरांनी या हाफ मॅरेथॉनचे उदघाटन केले.
२१, १० आणि ५ किमी अशा तीन गटांत ही मॅरेथॉन घेण्यात आली. पोलीस प्रशिक्षण केंद्राचे आकाश कंग्राळकर यांनी या मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. पोलीस प्रशिक्षण केंद्रात रोज १५ किमी धावावे लागते. तो सर्व करून ५ हजार मीटरच्या या मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन विजयी झालो असे त्यांनी यावेळी सांगितले. युवावर्गाला सुरक्षा दलांसारख्या नोकऱ्यांत फिटनेस पहिला जातो. त्यामुळे अशा मॅरेथॉनसारख्या उपक्रमांचा फिटनेससाठी उपयोग होतो असे आकाश कंग्राळकर यांनी सांगितले. शेंद्री गावच्या रोहिणी लक्ष्मण पाटील या युवतीने यंदा प्रथमच बेळगाव हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. हा अनुभव स्फूर्तिदायक असल्याचे तिने सांगितले. मी रोज धावण्याचा सर्व करते. मॅरेथॉनसारख्या उपक्रमांमुळे नवे काही करण्याची स्फूर्ती मिळते. आजचा अनुभव असाच होता असे रोहिणी म्हणाली. 
मराठा इन्फन्ट्रीच्या एका सहभागी जवानाने सांगितले की, कोविडसारख्या संकटात सर्वानीच फिटनेस मंत्र जपण्याची गरज निर्माण झाली आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे लक्षात घेऊन प्रत्येकाने अशा उपक्रमांत सहभागी होऊन तंदुरुस्ती राखावी असे आवाहन त्यांनी केले. आयोजक रोटेरियन वीन्यकुमार बाळीकाई यांनी, ही हाफ मॅरेथॉन गेल्या ४ वर्षांपासून भरविण्यात येत आहे. आरोग्यपूर्ण समाज निर्मितीसाठी भरविण्यात येणाऱ्या या मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद लाभत आहे. ३ प्रकारांत भरविण्यात आलेल्या या हाफ मॅरेथॉनमध्ये प्रत्येकी सुमारे ४०० धावपटूंनी भाग घेतल्याचे सांगितले.
नंदिनी दूध, टायटन आदी प्रायोजक कंपन्यांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.


Recent Comments