Belagavi

भरतेश कन्नड माध्यम शाळेत चिगुरु कार्यक्रमाचे आयोजन

Share

केवळ शिक्षण म्हणजे शाळा नसून यासोबतच सांस्कृतिक, क्रीडा उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक ए ए सनदी यांनी व्यक्त केले. भरतेश कन्नड माध्यम शाळेत आयोजित करण्यात आलेल्या चिगुरु या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

कन्नड आणि सांस्कृतिक विभाग तसेच एसपीएच भरतेश कन्नड माध्यम शाळा, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव उपक्रमांतर्गत चिगुरु या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन भरतेश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राजेश दोड्डान्नावर यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ए ए सनदी हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना ए ए सनदी म्हणाले, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासारखे अनेक दिग्गज यांनी आपापल्या कलेमध्ये मोठी साधना केली आहे. एखाद्या कलेत आपण सर्वांनी विविध कलांमध्ये प्रावीण्य मिळवून पुढे जायला हवे हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. सांस्कृतिक कार्यक्रमात, क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला पाहिजे, कोणत्याही कारणास्तव आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये, नेहमी सकारात्मक विचार करावेत, असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

यावेळी हिंदुस्थानी संगीत, देशभक्तीपर गीते, एकपात्री अभिनय, जनपद संगीत, जानपद नृत्य, समूह गीत गायन सारख्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. या कार्यक्रमाला कन्नड आणि सांस्कृतिक विभागाचे सहसंचालक बसवराज होगार, तहसीलदार आर.के. कुलकर्णी, कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या सहाय्यक संचालिका विद्यावती भजंत्री आदींसह शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: