Belagavi

भूतरामनहट्टी प्राणी संग्रहालयातील सिंहाचा मृत्यू !

Share

बेळगावजवळील भूतरामनहट्टी प्राणी संग्रहालयातील एका सिंहाचा आजारामुळे मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री घडली असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

होय, भूतरामनहट्टी प्राणी संग्रहालयातील एका सिंहाचा आजारामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. भूतरामनहट्टी प्राणी संग्रहालयाचा विकास करून त्याकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी वन खात्याच्या वतीने योजना जारी करण्यात आली. करोडो रुपये खर्च करून तेथे विविध वन्य प्राणी आणण्यात आले आहेत. तीनच महिन्यांपूर्वी या प्राणी संग्रहालयात एक नर व एक मादी सिंह आणण्यात आले होते. त्यापैकी नर सिंहाचा आजाराने मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री सिंहाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आजारामुळे या सिंहाचा मृत्यू झाल्याचे वन खात्याचे अधिकारी सांगत असले तरी पुरेशा आहाराअभावी या सिंहाचा मृत्यू झाल्याचा आरोप ऐकिवात आहे. वन्य प्राण्यांच्या आहारात वनाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्यानेच पुरेशा आहाराअभावी प्राण्यांना उपाशी रहावे लागत आहे. त्याच्या परिणामस्वरूप वन्य प्राणी आजारी पडत आहेत. असाच प्रकार मृत सिंहाच्या बाबतीतही घडल्याचा आरोप प्राणीप्रेमींनी केला आहे. या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, सिंहाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भूतरामनहट्टी प्राणी संग्रहालयाला भेट देऊन पाहणी केली. मृत सिंहाचे शव विच्छेदन करण्यात आले आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर सिंहाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

 

 

Tags: