बेळगावमधील के एल इ संस्थेमध्ये झालेल्या एका सत्यघटनेवर आधारित चित्रपटाच्या बॅनरचे आणि अल्बमचे उद्घाटन केएलईचे कार्याध्यक्ष आणि माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांच्याहस्ते नुकतेच पार पडले.

केएलई संस्थेच्या १०६ व्या वर्धापनदिनानिमित्त्ताने तसेच वैद्यकीय क्षेत्रात देहदानासंदर्भात इतिहास निर्मिती करणारे डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्ट, बैलहोंगलचे संस्थापक दिवंगत बी. एस. रामण्णावर यांच्या १३व्या पुण्यतिथीनिमित्ताने कन्नड चित्रपटाच्या बॅनरचे आणि अल्बम चे उद्घाटन करण्यात आले. पी. दीक्षित इंटरप्रायझेस सुळेभावी – बागलकोट निर्मित सत्यघटनेवर आधारित ‘देह इल्लि, आत्मा एल्ली?’ या कन्नड चित्रपटाच्या बॅनरचे उद्घाटन करण्यात आले. 

बेळगावच्या के एल इ संस्थेमध्ये झालेल्या घटनेवर आधारित अल्बम मध्ये गाण्यांचा समावेश आहे. यामध्ये देहदानाविषयक जागृतीसंदर्भात संदेश देण्यात आला असून आपल्या पित्याच्या त्याच्या मुलाने देहदान करून इतिहास निर्माण केला आहे. या अल्बमचा उद्देश देहदान आणि अवयव दानाबद्दल जागरुकता वाढवण्याचा आहे. या चित्रपटासाठी सदाशिव हिरेमठ यांनी छायाचित्रण केले आहे. यावेळी चित्रपटातील एक गाणे रिलीज करण्यात आले असून पुनीत राजकुमार यांच्या प्रेरणेतून ज्याप्रमाणे त्यांच्या चाहत्यांनी नेत्रदानासाठी पुढाकार घेतला त्याप्रमाणे देहदान आणि अवयव दानासंदर्भातदेखील पुढाकार घेण्यासाठी या चित्रपटाच्या माध्यमातून जागृती करण्यात आली आहे. 
यावेळी पी दीक्षित बोलताना म्हणाले, डॉ. महांतेश रामण्णावर यांच्या वडिलांचे जीवन अद्भुत असे आहे. डॉ. महांतेश रामण्णावर यांनी त्यांच्या वडिलांच्या पार्थिवाबद्दल घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद असून याच गोष्टीवर प्रेरित होऊन सुमारे ३ कोटी रुपयांच्या खर्चातून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. समाजात देहदानाविषयी जागृती निर्माण करण्यासंदर्भात सदर चित्रपटाची निर्मिती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी केएलई विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. विवेक साऊजी, अध्यक्ष महांतेश कौजलगी, कार्यदर्शी बी. बी. देसाई, डॉ. सुनील जलालपुरे, डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. सुशीलादेवी रामण्णावर, देहदानासंदर्भात जागृती करण्यासाठी आपल्या वडिलांचा देह दान देणारे डॉ. महांतेश रामण्णावर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments