गावठी पिस्तूल विकणाऱ्या आंतरराज्य टोळक्याच्या मुसक्या आवळण्यात खानापूर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून २ गावठी पिस्तुल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

होय, गावठी पिस्तूल विक्रीच्या आंतरराज्य अवैध व्यवसायाचा भांडाफोड करण्यात बेळगाव पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी आंतरराज्य टोळक्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून २ गावठी पिस्तुल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलिस व इतरांना कानोकान खबर न लागता मध्यप्रदेशातून बेळगावात गावठी पिस्तूल आणून कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या ३ राज्यांत त्यांची विक्री केली जात होती. १ लाख रुपयांना १ अशी ही गावठी पिस्तुले विकण्यात येत होती. ५ नोव्हेंबर रोजी खानापूरचे पोलीस निरीक्षक शिंगे नाईट पेट्रोलिंग करत असताना त्यांना संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या या टोळीचे सदस्य हाती लागले. खानापूर पोलिसांनी त्यांच्याकडून २ गावठी पिस्तुल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त केली.

या प्रकरणी कर्नाटकातील ५, महाराष्ट्रातील ३ आणि मध्यप्रदेशामधील दोघांवर अशा एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी एका रौडीशिटरसह ८ जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. धारवाड जिल्ह्यातील अन्नीगेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रौडीशिटर उमेश याचा त्यात समावेश आहे. उमेश हा लोकांना पिस्तुलाची भीती दाखवून लुटण्यासाठी हे पिस्तूल खरेदी करण्यास आला होता अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. त्याशिवाय, महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील तुळशीदास जोशी हा मध्यप्रदेशातील आरोपींकडून गावठी पिस्तूल खरेदी करून त्यांची विक्री कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यात करीत होता असे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. या तुळशीदासला गावठी पिस्तूल पुरवणारा मध्यप्रदेशातील वर्णा जिल्ह्यातील विजय रामलाल ठाकूर यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील मध्यप्रदेशातीलच प्रमुख आरोपी फरारी झाला असून त्याचा शोध सुरु आहे. या संदर्भात बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी अधिक माहिती दिली. एकंदर, पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करून गावठी पिस्तूल विक्रीचा अवैध धंदा करणाऱ्या आंतरराज्य टोळक्याच्या मुसक्या आवळण्यात बेळगाव पोलिसांना यश आले असून, त्याच्यावर खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


Recent Comments