ऐतिहासिक वारसा लाभलेल्या विजापूर जिल्ह्याला धार्मिक ऐक्याचीही मोठी परंपरा आहे. त्यात भर घालत जिल्ह्यातील एका मुस्लिम भक्ताने ग्रामदैवत हनुमंताला नवस फेडण्यासाठी चांदीचा मुखवटा अर्पण केला आहे.

विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील दाश्याळ गावातील मेहबूबसाब काशीमसाब टक्कोड या मुस्लिम भक्ताने ग्रामदैवत हनुमंताला नवस फेडण्यासाठी चांदीचा मुखवटा अर्पण केला. मंदिराचे पुजारी आणि गावातील ज्येष्ठांच्या परवानगीने या चांदीच्या मुकुटाची गावभर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील सुवासिनींनी कुंभ मिरवणूक काढली. यावेळी ठिकठिकाणांहून आलेल्या भक्तांना मेहबूबसाब यांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या नवसफेदीमागेही एक मोठी कथा आहे. मेहबूबसाब यांचे वडील काशीमसाब दस्तगीरसाब टक्कोड हे शेतकरी, त्यांना एकदा बैलगाडीतून येताना वाटेत अपघात होऊन जबर मार बसला. ते बरे व्हावेत यासाठी मारुतीची परमभक्त असलेल्या त्यांच्या आईने मारुतीरायाला नवस बोलला होता. काशीमसाब बरे झाल्यावर अर्ध्या तोळे सोने अर्पण करतो असा नवस आईने बोलला होता. मात्र गरिबीमुळे तो फेडणे शक्य झाले नव्हते असे मेहबूबसाब यांनी सांगितले.
त्यानंतर घरची गरिबी दूर होण्यासाठी त्याच मारुतीरायाला पुन्हा नवस बोलण्यात आला. आता ५० वर्षानंतर त्यांची मुले सधन झाल्यावर त्यांनी नवस फेडण्याची इच्छा मारुती मंदिराचे पूजारी आणि गावातील ज्येष्ठांजवळ बोलून दाखवली. त्यांनीही आनंदाने याला संमती दिली. त्यानुसार दिवाळीदिवशी मारुतीरायाची चांदीच्या मुखवट्याची मिरवणूक काढून, विधिपूर्वक हा मुखवटा मारुतीरायाला अर्पण करण्यात आला.
एकूण ५० वर्षानंतर का असेना पण एका मुस्लिम कुटुंबाने आपल्या वडील आणि आजीने बोललेला नवस फेडून धार्मिक ऐक्याचे दर्शन घडवीत गावकऱ्यांची प्रशंसा मिळवली आहे.
विजयकुमार सारवाड, आपली मराठी विजापूर.


Recent Comments