एका इमारतीत सुरु असलेला धर्मांतराचा प्रयत्न हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडल्याची घटना बेळगावातील टिळकवाडीतील मराठा कॉलनीत रविवारी सकाळी घडली. यावेळी ख्रिश्चन पाद्र्याला कार्यकर्त्यांनी चांगलेच फैलावर घेतले.

टिळकवाडीतील मराठा कॉलनीत रविवारी सकाळी धर्मांतराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. एका इमारतीत २०० हुन अधिक लोकांना जमवून त्यांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यात येत असल्याची खबर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना मिळाली. लागलीच मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते त्याठिकाणी जमा झाले. त्यांनी ताबडतोब त्या इमारतीला घेराव घातला. यावेळी तेथे प्रार्थनासभा घेणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरूला कार्यकर्त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. यावेळी ग्रामीण भागातील लोक प्रार्थनासभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर रविवारी याठिकाणी प्रार्थनासभा घेऊन धर्मांतर करण्यात येत असल्याचा आरोप करून कार्यकर्त्यांनी घेराव घातला.
हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी इमारतीला घेराव घातल्याचे पाहून काहीजणांनी घटनास्थळावरुन काढता पाय घेतला. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थितांना एका कडेला उभे करून पोलिसांना पाचारण केले. यावेळी घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. टिळकवाडी पोलीस स्थानकाचे २०हुन अधिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस संबंधित पाद्री आणि इतरांची चौकशी करत आहेत. टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.


Recent Comments