hubali

अंजली खून प्रकरणात आरोपी दोषी; २५ नोव्हेंबरला शिक्षेची घोषणा

Share

हूबळीतील अंजली अंबिगेर खून प्रकरणात न्यायालयाने आरोपी गिरीश ऊर्फ विश्वनाथ सावंत याला दोषी ठरवले आहे. २५ नोव्हेंबर रोजी शिक्षेची घोषणा होणार असल्याने सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

१५ मे २०२४ रोजी हुबळीतील वीरापूर ओणीत ही घटना घडली होती. घरात झोपलेल्या २० वर्षीय अंजलीला उठवून आरोपीने चाकूने अनेक वार करत तिची हत्या केली होती. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती.

या प्रकरणात पोलिसांच्या निष्काळजीपणाचा आरोपही चर्चेत आला होता. आरोपीने अंजलीला धमकी दिली असतानाही पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस विभागातील काही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने तपास सीआयडीकडे सोपवला होता. सीआयडीने विविध अंगांनी तपास करून ४९४ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. त्यामध्ये सीसीटीव्ही दृश्ये आणि प्रत्यक्षदर्शींसह एकूण ८५ साक्षीदारांचा समावेश होता. अंजली आणि आरोपी यांच्यातील वैमनस्यातून हत्या झाल्याचे तपासात नमूद करण्यात आले होते.

दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून साक्षीदारांचे जबाब आणि पुराव्यांची पडताळणी केली. त्यानंतर हुबळीच्या प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी घोषित केले.

सुमारे दीड वर्षांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर हा निकाल लागला आहे. आता २५ नोव्हेंबर रोजी आरोपीला कोणती शिक्षा सुनावली जाते, याकडे अंजलीच्या कुटुंबीयांसह राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Tags: