Belagavi

शांतादेवी कणवी यांच्या साहित्याचा जागतिक स्तरावर विचार व्हावा

Share

शांतादेवी कणवी या नव्या कन्नड महिला साहित्याच्या विकासाचे प्रतीक असून, त्यांच्या साहित्याचा जागतिक स्तरावर विचार होण्याची गरज आहे, असे मत बसवराज कट्टीमनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष यल्लाप्पा बिम्मडी यांनी व्यक्त केले.

केंद्रीय साहित्य अकादमी आणि कर्नाटक लेखिकांच्या संघाच्या जिल्हा शाखेतर्फे शनिवारी आयोजित ‘नारी चेतना’ या शांतादेवी कणवी साहित्यावरील कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते.

कन्नड साहित्यविश्वातील समीक्षकांनी शांतादेवी यांच्या साहित्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगत, सध्या महिला संवेदना, स्त्रीस्वातंत्र्य आणि समानतेच्या मुद्द्यांवर जागतिक स्तरावर चर्चा होत आहे. अशा काळात त्यांच्या कथांमधील आशयही जागतिक चर्चेचा विषय व्हायला हवा, असे बिम्मडी म्हणाले.

नवोदय साहित्याचा प्रभाव असलेल्या काळात शांतादेवी यांनी लेखनाला सुरुवात केली. प्रगतिशील साहित्याच्या काळात त्यांनी महत्त्वपूर्ण साहित्यनिर्मिती केली. आधुनिक साहित्यापेक्षा स्थानिक जीवनातील संघर्ष आणि प्रश्नांना त्यांनी कथांचा विषय बनवले, ही त्यांच्या लेखनाची विशेषता असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘शांतादेवींच्या कथांमधील स्त्रीवादी दृष्टिकोन’ या विषयावर बोलताना लेखिका मैत्रेयीनी गदिगेप्पगौडर यांनी, पाश्चात्त्य आणि भारतीय स्त्रीवादातील फरक स्पष्ट करत शांतादेवींनी सुमारे ५० वर्षांपूर्वीच हे विचार प्रभावीपणे मांडल्याचे सांगितले.

महिलांच्या अस्तित्वाला आणि जीवनाला सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या आव्हानांचे त्यांनी निर्भीडपणे चित्रण केले. त्यांच्या २५ हून अधिक कथांमध्ये एकल पालकत्व, तर सुमारे ३० कथांमध्ये विवाहबाह्य संबंधांचा विषय हाताळण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून होणाऱ्या लैंगिक शोषणाचे चित्रणही त्यांनी त्या काळात केले होते, असे मैत्रेयीनी यांनी स्पष्ट केले.

आज स्त्रीवादी कथांना जागतिक स्तरावर महत्त्व मिळत असून अशा आशयाच्या साहित्याला बुकरसारखे पुरस्कारही मिळत आहेत. या साहित्यिक शक्यता शांतादेवी यांनी पाच दशकांपूर्वीच आपल्या लेखनातून मांडल्या होत्या, असे त्या म्हणाल्या.

‘शांतादेवी यांचा सर्जनशील प्रवास’ या विषयावर त्यांची कन्या रंजना अशोक गोधी, तर ‘शांतादेवींच्या कथांमधील ग्रामीण जीवन’ या विषयावर लेखिका कविता कुसुगल्ल यांनी विचार मांडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिकांच्या संघाच्या जिल्हाध्यक्ष के. आर. सिद्धगंगम्मा होत्या. साहित्य अकादमीच्या कन्नड सल्लागार मंडळाचे सदस्य चन्नाप्प अंगडी यांनी प्रास्ताविक केले. कवयित्री प्रेमा तहसीलदार व्यासपीठावर उपस्थित होत्या. लेखिका निर्मला बट्टल यांनी सूत्रसंचालन केले.

Tags: