बेळगावच्या सुवर्ण विधानसौधात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीची विधानसभा अध्यक्ष जी. एस. पाटील आणि विधान परिषद सभापती सलीम अहमद यांनी संयुक्त पाहणी केली. उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यासह बेळगावात सरकारी आमदार भवन उभारण्याची घोषणा त्यांनी केली.

यावेळी सभागृहातील व्यवस्था, लोकप्रतिनिधींची निवासव्यवस्था, भोजन, वाहतूक आणि स्वच्छता यासह विविध सुविधांचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याशी चर्चा करून आवश्यक सूचना देण्यात आल्या.

यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत विधानसभा अध्यक्ष जी. एस. पाटील यांनी यंदाच्या अधिवेशनात केवळ चर्चांवर भर न देता, चर्चेतील विषयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले. विशेषतः उत्तर कर्नाटकचा विकास आणि या भागातील महत्त्वाच्या समस्यांवर उपाय शोधण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यंदाच्या अधिवेशनादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पुस्तक मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह आमदार व मंत्र्यांच्या निवासस्थानी दररोज योग प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच सभागृहाचे कामकाज पाहण्यासाठी येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रशिक्षण देण्याची विशेष योजना आखण्यात आली आहे. अधिवेशनादरम्यान होणाऱ्या आंदोलनांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावरील समस्या स्थानिक पातळीवरच सोडविण्याच्या सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
विधान परिषद सभापती सलीम अहमद यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्रितपणे राज्यातील विविध समस्यांवर उपाय शोधून अधिवेशनाचे कामकाज अर्थपूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी बेळगावात सुसज्ज आमदार भवन उभारण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. आम्ही दोघेही उत्तर कर्नाटकातील असून या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. खासगी संस्थांना संधी न देता सरकारतर्फेच बेळगावात सुसज्ज आमदार भवन उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असे सलीम अहमद यांनी सांगितले. तसेच सुवर्णसौध कायम कार्यरत राहावे, यासाठी दरमहा आमदारांच्या नेतृत्वाखाली समितीच्या बैठका याच ठिकाणी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments