Belagavi

बसवविरोधी वातावरण रोखण्यासाठी जनतेने मौन सोडावे : सतीश जारकिहोळी

Share

संत बसवेश्वर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात वक्तव्ये होऊ लागली असून, जनतेने मौन बाळगल्यास अशा विरोधी प्रवृत्तींना अधिक बळ मिळेल, असा इशारा मंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिला. या विरोधात केवळ नेत्यांनीच नव्हे, तर सर्वसामान्य जनतेनेही एकत्रितपणे आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.

संत बसवेश्वरांविरोधात बोलण्याची प्रवृत्ती सुरू झाली असून, संबंधितांकडून सध्या अशा वक्तव्यांची चाचपणी केली जात असल्याची चिंता सतीश जारकिहोळी यांनी व्यक्त केली. जनतेने याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात संत बसवेश्वरही काल्पनिक होते किंवा त्यांचे अस्तित्वच नव्हते, अशी वक्तव्ये केली जाऊ शकतात. अशा वेळीही जनता शांत राहणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संत बसवेश्वर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रश्न उपस्थित केल्यास प्रत्येकाने त्याला विरोध करून आपले मत मांडले पाहिजे, असे जारकिहोळी म्हणाले. आज विरोध नोंदवण्यासाठी आणि आपले मत व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे केवळ नेत्यांपुरता विरोध मर्यादित न राहता जनतेनेही सामूहिकपणे प्रतिक्रिया द्यावी. तसेच कोण कोणाला विरोध करत आहे, याकडे सर्वांनी लक्ष ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

Tags: